टीम इंडियाने हॉकीमध्येही पाकिस्तानला धुतलं, कॅप्टन हरमनप्रीत ठरला विजयाचा हिरो
एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 2-1 ने पराभव केला.
Asian Championship 2024 Hockey : भारतीय संघाने एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली असून शनिवारी पाकिस्तानला सुद्धा धूळ चारली आहे. शनिवार 14 सप्टेंबर रोजी चीनच्या हुलूनबुइर येथे भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात ग्रुप स्टेजचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 2-1 ने पराभव केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन्ही गोल केले. तर पाकिस्तानकडून एकमात्र गोल अहमद नदीमने केला.
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांमध्ये कांटे की टक्कर होती. खेळाच्या सातव्या मिनिटाला पाकिस्तानने एक गोल केला. त्यावेळी भारताच्या हातून हा सामना जातो की काय असे वाटतं होते मात्र त्यानंतर भारताच्या हॉकी टीमचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने 13 व्या मिनिटाला पहिला गोल केला तर 17 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. सामन्याच्या तिसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानने गोलची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय टीमच्या डिफेंसमुळे ते गोल करू शकले नाही. अखेर भारताचा 2-1 ने आघाडी घेत विजय मिळवला.
भारताचा लागोपाठ पाचवा विजय :
एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा हा लागोपाठ पाचवा विजय आहे. भारतीय टीमने यापूर्वी झालेल्या सामन्यात कोरियाला 3-1 ने हरवलं. त्यापूर्वी भारताने मलेशियाला 8-1 ने हरवून सेमी फायनलमध्ये एंट्री घेतली होती. स्पर्धेतील दुसरा सामन्यात भारताने चीनला 3-0 तर जपानला 5-0 ने पराभूत केले होते.आशिया चॅम्पियनशिपमध्ये 4 सामने जिंकून टीम इंडियाने 12 पॉईंट्स मिळवले होते. यासह टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये नंबर एकवर होती आता लागोपाठ पाचवा सामना जिंकल्याने भारताने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. तर पाकिस्तानने आतपर्यंत स्पर्धेत एकूण ४ सामने खेळले असून यापैकी 2 सामने ड्रॉ झाले तर एका सामन्यात त्यांनी विजय मिळवला आणि एका सामन्यात त्यांचा पराभव झाला. यामुळे पाकिस्तान सध्या 5 पॉईंट्स मिळवून पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ यापूर्वीच सेमी फायनलमध्ये पोहोचले आहेत.