World Cup 2023 Ind vs Aus : अहमदाबदच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून घरच्या मैदानावरच भारताचा पराभव केला होता. या पराभवानमुळे वर्ल्डकप भारतीय चाहते मोठ्या प्रमाणात निराश झाले. तर दुसरीकडे राजकारण्यांनी नेहमीप्रमाणे या सामन्यावरुनही राजकारण सुरु केले. आपण वर्ल्डकप जिंकला असता पण पनौतीमुळे हरलो असं विधान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका सभेत केल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री यांनी पराभवाला थेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जबाबदार धरलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) यांनी भारतीय संघाच्या पराभवाचं कारणही सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भारताच्या पराभवाचे कारण सांगितलं आहे. वर्ल्डकपचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जयंतीदिनी खेळवण्यात आल्यामुळे भारताचा पराभव झाल्याचे मुख्यमंत्री सरमा यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री सरमा हे तेलंगणा निवडणुकीदरम्यान चारमिनार इथे एका सभेमध्ये बोलत होते.


काय म्हणाले मुख्यमंत्री सरमा?


"पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणाऱ्यांशी विरोधी पक्षांची एकी आहे. मला बीसीसीआयला सांगायचे आहे की, भविष्यात नेहरू-गांधी कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा जन्म झाला त्या दिवशी अंतिम सामना होणार नाही याची काळजी घ्यावी. त्या दिवशी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा अंतिम सामना होता. आपण प्रत्येक सामना जिंकत होतो. पण फायनल हरलो. मग मी पाहिले तो कोणता दिवस होता. आम्ही का हरलो? आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही दिवसानुसार चालतो. माझ्या लक्षात आले की वर्ल्डकपचा अंतिम सामना इंदिरा गांधींच्या जयंती दिवशी खेळला गेला होता. इंदिरा गांधींच्या जयंतीदिनी वर्ल्डकप फायनल झाली आणि देशाचा पराभव झाला. त्यामुळे मला बीसीसीआयला सांगायचे आहे की वर्ल्डकपचा अंतिम सामना तुमच्याकडे असेल तर दिवस जरा नीट पाहा. त्या दिवशी गांधी घराण्याशी संबंध असायला नको, नाहीतर देशाचे नुकसान होईल," असे हेमंता बिस्वा सरमा म्हणाले.


नितेश राणेंचीही टीका


राहुल गांधी यांच्या विधानानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. 19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी यांची जयंती होती, मग भारत जिंकला पाहिजे होता. मग खरी पनौती कोण? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता.