हैदराबाद : महिला धावपटू दुती चंदनं केलेल्या खुलाश्यामुळे सध्या भारतीय क्रीडाविश्वात खळबळ माजली आहे. दुतीनं आपण समलैंगिंक संबंधांमध्ये असून आपल्याला आयुष्याची साथादीर गवसल्याचं म्हटलं आहे. ओडिशाची धावपटू असलेल्या दुतीनं आपल्या पार्टनरच्या मताचा आदर राखत तिची ओळख उघड करण्यास मात्र नकार दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रेम करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला मिळालं पाहिजे. माझ्या या खुलाशानंतर एक खेळाडू म्हणून मला कोणीही जज करु नये असंही तिनं म्हटलं आहे. आपलं आगामी लक्ष्य हे वर्ल्ड चॅम्पियनशिप्स आणि ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचंही तिनं सांगितलं. दुतीनं आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला शंभर आणि दोनशे मीटरमध्ये दोन रौप्य पदकांची कमाई करुन दिली आहे.


सध्या हैदराबादमध्ये सराव करणारी दुती म्हणाली, 'माझ्या गावात राहणाऱ्या १९ वर्षांच्या मुलीवर मागच्या ५ वर्षांपासून माझं नातं आहे. ती भुवनेश्वरच्या कॉलेजमध्ये बीएच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ती माझी नातेवाईक आहे. मी जेव्हा घरी येते तेव्हा तिच्यासोबत वेळ घालवते. ती माझ्यासाठी आयुष्याच्या जोडीदारासारखी आहे. भविष्यात तिच्यासोबत संसार करण्याची माझी इच्छा आहे.'


मागच्याच वर्षी सर्वोच्च न्यायालयाने प्रौढांमध्ये सहमतीने असलेल्या समलैंगिंक संबंध गुन्हा नसल्याचं सांगितलं होतं. असं असलं तरी भारतात समलैंगिक लग्नाला वैधता देण्यात आलेली नाही.


१०० मीटर रेस ११.२४ सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा राष्ट्रीय रेकॉर्ड दुतीच्या नावावर आहे. आपल्या आई-वडिलांना या नात्याविषयी कोणतीही आपत्ती नाही, पण मोठ्या बहिणीने याला आक्षेप घेतल्याचं दुतीने सांगितलं. मोठ्या बहिणीने आपल्याला घराबाहेर काढून जेलमध्ये पाठवण्याची धमकी दिल्याचा दावा दुतीने केला आहे.