लवकरच होणार Hockey India League साठी लिलाव; पीआर श्रीजेशने आधीच घेतले आपले नाव मागे
Hockey India League: आठ पुरुष संघ तर सहा महिला संघांसाठी १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
PR Sreejesh: बहुप्रतिक्षित हॉकी इंडिया लीगच्या पुनरागमनाची शुक्रवारी दिल्लीत घोषणा झाली. तब्ब्ल आठ वर्षांनंतर ही लीग पुनरागमन करत आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तुर्की यांनी आठ पुरुष आणि सहा महिला संघांसाठी फ्रँचायझी आणि मालकांची घोषणा केली. या आधीच्या सिजनमध्ये फक्त पुरुष संघ होते, यावेळी मात्र महिला संघही खेळणार आहे.
पुरुष टीम्स आणि त्यांचे मालक
चार्ल्स ग्रुप (चेन्नई), यदू स्पोर्ट्स (लखनौ), जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स (पंजाब आणि हरियाणा), श्राची स्पोर्ट्स (कोलकाता), एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट (दिल्ली), वेदांत लिमिटेड (ओडिशा), रिझोल्युट स्पोर्ट्स (हैदराबाद), नवोयम स्पोर्ट्स (रांची) हे आठ पुरुष संघांचे मालक आणि संबंधित शहरे आहेत.
महिला टीम्स आणि त्यांचे मालक
जेएसडब्लू स्पोर्ट्स (पंजाब आणि हरियाणा), श्राची स्पोर्ट्स (कोलकाता), एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट (दिल्ली), नवोयम स्पोर्ट्स (ओडिशा) या चार टीम्सची सध्या पुष्टी झालेली आहे. या महिन्यात आणखी दोन फ्रँचायझी लवकरच निश्चित केल्या जातील.
श्रीजेशने घेतले नाव मागे
पीआर श्रीजेश या भारताच्या स्टार खेळाडूने आगामी हॉकी इंडिया लीग खेळाडूंच्या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्यपदक जिंकून देण्यात मदत केल्यानंतर गोलकीपर पीआर श्रीजेशने ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. यानंतर या खेळाडूला खेळताना बघण्याची ही चांगली संधी होती. पंरतु श्रीजेशने बुधवारी हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांना सांगितले की, “बऱ्याच विचारांनंतर मी आगामी हॉकी इंडिया लीगसाठी खेळाडूंच्या लिलावातून माझे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे."
नाव मागे घेण्याचे कारण काय?
श्रीजेशने पुढे सांगतले की, " पॅरिसहून परतल्यानंतर माझ्यासाठी निवृत्ती समारंभ खूप छान झाला. एवढ्या उंचीवर आपली कारकीर्द संपवण्याची संधी फार कमी खेळाडूंना मिळते. गेले दीड महिना खूप आनंददायी आणि समाधान देणारा गेला. माझ्यासाठी स्पेनविरुद्धच्या विजयानंतर गोलपोस्टवर माझ्या सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करणे खूप खास होते. या आठवणी कायम माझ्यासोबत राहाव्यात अशी माझी इच्छा आहे. 'वन लास्ट डान्स'साठी मैदानात परतणे सध्या योग्य वाटत नाही आणि मला भीती वाटते की ते त्या आठवणी आणि खास क्षण खराब करतील"
स्पोर्टस्टारशी बोलताना श्रीजेशने खुलासा केला की, " नेहमीप्रमाणे हॉकी इंडिया लीग ही स्पर्धा युवा खेळाडूंना चमकण्यासाठी एक मोठं व्यासपीठ देईल. खरं तर एक खेळाडू म्हणून मी जे स्वप्न पाहिले होते ते सर्व मी मिळवलं आहे. परंतु आता खेळत राहणे माझ्यासाठी अयोग्य ठरेल. कारण यामुळे कदाचित प्रतिभावान तरुण खेळाडूला संधी मिळणार नाही."
नवीन खेळाडूला संधी देण्यासाठी पीआर श्रीजेश हॉकी इंडिया लीगच्या लिलावातून आपले नाव मागे घेतले आहे.