`कोरोना`चा फटका, न्यूझीलंडच्या खेळाडूला करावं लागलं हे काम
कोरोना व्हायरसमुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे.
सिडनी : कोरोना व्हायरसमुळे जगभरात मोठ्या प्रमाणावर जीवित आणि आर्थिक हानी झाली आहे. कोरोना व्हायरसचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सुरु असलेली वनडे सीरिज प्रेक्षकांशिवाय खेळवली जात आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने पहिले बॅटिंग करुन ५० ओव्हरमध्ये २५८/७ एवढा स्कोअर केला. डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ६७ रन केले, तर एरॉन फिंचला ६० रन आणि मार्नस लॅबुशेनने ५६ रनची खेळी केली. मिचेल मार्शला २७ रन करता आले.
ऑस्ट्रेलियाच्या बॅट्समननी मॅचमध्ये एकूण ४ सिक्स लगावले. यातले दोन सिक्स कर्णधार एरॉन फिंच आणि स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्सने प्रत्येकी १-१ सिक्स मारला. मॅचमध्ये जेव्हा सिक्स लगावला जातो तेव्हा स्टेडियममध्ये बसलेले प्रेक्षक बॉल पुन्हा खेळाडूंना देतात. यावेळी मात्र मैदानात प्रेक्षकच नसल्यामुळे खेळाडूंनाच जाऊन बॉल आणावा लागत होता.
न्यूझीलंडचा खेळाडू लॉकी फर्ग्युसन याने स्टेडियममध्ये जाऊन सिक्स मारलेला बॉल आणला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या उरलेल्या दोन वनडे मॅचही प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतली धर्मशाळामधली पहिली वनडे पावसामुळे रद्द करण्यात आली होती. दुसरी वनडे १५ तारखेला लखनऊमध्ये आणि तिसरी वनडे १८ तारखेला कोलकात्यामध्ये खेळवला जाईल.