मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये २६ डिसेंबरपासून तिसरी टेस्ट मॅच सुरु होणार आहे. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. आता तिसरी टेस्ट जिंकून सीरिजमध्ये अजेय आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही टीम मैदानात उतरतील. पण या टेस्ट मॅचसाठी ऑस्ट्रेलियानं ७ वर्षांचा लेग स्पिनर आर्ची सिचीलर याची टीममध्ये निवड केली आहे. सिचीलर हा ऑस्ट्रेलियाच्या टीममधला १५वा सदस्य आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी सिचीलरनं ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर सराव केला होता. तेव्हाच आर्ची तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये असेल हे ठरलं होतं. याची घोषणा ऑस्ट्रेलियाच्या कर्णधार टीम पेननं केली आहे.


सिचीलर ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये सामील होईल याची घोषणा ऑक्टोबर महिन्यात, जेव्हा ऑस्ट्रेलिया पाकिस्ताविरुद्ध युएईमध्ये खेळत होती, तेव्हाच झाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या मुख्य प्रशिक्षकांनी सिचीलरला फोन केला होता आणि विराट कोहलीला आऊट कर, असं सांगितलं होतं.



आर्ची सिचीलरची हृदयद्रावक कहाणी


ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये निवड करण्यात आलेल्या आर्ची सिचीलरची कहाणी हृदयद्रावक आहे. आर्चीला ३ महिन्यांचा असल्यापासून हृदयाचा आजार आहे. ऍडलेडमध्ये राहणाऱ्या आर्चीवर आत्तापर्यंत १३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यातली एक तर ओपन हार्ट सर्जरी होती. आर्चीवर करण्यात आलेली ओपन हार्ट सर्जरी तो फक्त ३ महिन्यांचा असताना करण्यात आली होती. 


क्रिकेटप्रेमी असणाऱ्या आर्ची सिचीलरचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीमचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी त्याला ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये जागा दिली. आर्ची खूप आयुष्यात खूप कठीण प्रसंगातून गेला आहे. आयुष्यातला बहुतेक वेळ तो हॉस्पिटलमधल्या बेडवर होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न करतोय, असं जस्टीन लँगर म्हणाले.