गुवाहाटी : दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं भारताचा ८ विकेट्स आणि २७ बॉल्स राखून पराभव केला आहे. भारतानं दिलेल्या ११९ रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियानं १५.३ ओव्हरमध्ये १२२ रन्स बनवल्या. ऍरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर लवकर आऊट झाल्यावर हेनरिक्स आणि हेडनं नाबाद १०९ रन्सची पार्टनरशीप करून ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. हेनरिक्सनं ४६ बॉल्समध्ये नाबाद ६२ रन्स केल्या तर हेडनं ३४ बॉल्समध्ये नाबाद ४८ रन्स केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराहनं प्रत्येकी एक विकेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. २० ओव्हरमध्ये भारतानं ११८ रन्स केल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये भारताला दोन धक्के बसले. त्यानंतर सातत्यानं भारतानं विकेट्स गमावल्या.


ऑस्ट्रेलियाकडून बेहरेनड्रॉफनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर झम्पाला दोन विकेट घेण्यात यश आलं. कुल्टरनाईल, टाय आणि स्टॉयनिसला प्रत्येकी एक विकेट मिळाली. केदार जाधवनं सर्वाधिक २७ रन्स केले तर हार्दिक पांड्या २५ रन्स करून आऊट झाला.


पहिल्या टी-20मध्ये भारताचा विजय झाल्यानंतर आता दुसऱ्या टी-20मध्ये ऑस्ट्रेलियानं जोरदार पुनरागमन केलं आहे. यामुळे तिसरी आणि अखेरची टी-20 दोन्ही टीमसाठी निर्णायक असणार आहे. १३ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये तिसरी टी-20 खेळवली जाणार आहे.