वर्ल्डकप सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर, 4 महिन्याच्या मुलाचं निधन
वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला वाईट बातमी मिळाली आहे. खेळाडूच्या 4 महिन्याच्या मुलाचं निधन झालं आहे. खेळाडून स्वत: सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
एकीकडे वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना ऑस्ट्रेलियन खेळाडूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फवाद अहमद याच्या 4 महिन्याच्या बाळाचं दुर्दैवी निधन झालं आहे. फवाद अहमदनेच सोशल मीडियावर बाळाचे पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. जून महिन्यात फवाद अहमदच्या पत्नीने दुसऱ्या बाळाला जन्म दिला होता. जन्मापासूनच हे बाळ आजारी होतं. रिपोर्टनुसार, बाळाला नेमका कोणता आजार होता याचं निदान होऊ शकलं नाही. त्यामुळे या आजाराची माहिती मिळवण्यासाठी आणि चाचण्या करण्यासाठी रुग्णालयात थांबला होता. मेलबर्नच्या रॉयल चिल्ड्रन रुग्णालयात बाळावर उपचार सुरु होते.
फवाद अहमदने एक्सवर केली पोस्ट
पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज फवाद अहमदने सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत ही आपल्या मुलाचं निधन झालं असल्याची माहिती दिली. आपल्या चार महिन्याच्या बाळाचे काही फोटोही त्याने शेअर केले आहेत. "आपण पुन्हा एकदा परत भेटेपर्यंत....दुर्दैवाने खूप मोठा लढा दिल्यानंतर माझ्या चिमुरड्याचा वेदनादायी आणि कठीण लढा संपला आहे. तू आता अजून चांगल्या जागी असशील अशी आशा आहे. आम्ही तुझी आठवण काढत राहू. कोणालाही अशा वेदनांमधून जावं लागू नये अशी आशा आहे," अशी पोस्ट फवादने केली आहे.
ऑस्ट्रेलियाकडून खेळला आहे 5 सामने
41 वर्षीय फवाद अहमदचा जन्म पाकिस्तानात झाला होता. 2010 मध्ये तो ऑस्ट्रेलियात गेला. 2013 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं. त्याने ऑस्ट्रेलियासाठी 3 एकदिवसीय आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत.
फवादने गेल्या महिन्यात आपल्या मुलाच्या प्रकृतीसंबंधी जाहीरपणे माहिती दिली होती. त्याने सांगितलं होतं की, खरं सांगायचं तर ही फार कठीण वेळ आहे. काय होणार आहे हे आम्हालाही माहिती नाही. डॉक्टरांनाही काही कल्पना नाही. हे फार वाईट आहे. या गोष्टीमुळे आमचं ह्रदय पिळवटून टाकलं आहे. हे असं काही आहे जे फार अनिश्चित आहे.
41 वर्षीय फवाद अहमदला 10 वर्षांपासून ऑस्ट्रेलिया संघात स्थान मिळालेलं नाही. पण तो जगभरातील टी-20 लीगमध्ये सहभागी होत असतो. बिग बॅशच्या मागील सीझनमध्ये तो मेलबर्न रेनेगेड्सचा भाग होता. याशिवाय पीएसएल, सीपीएल आणि ग्लोबल टी-20 कॅनडाकडूनही फवाद खेळला आहे.