मुंबई : एकेकाळी क्रिकेट जगतामध्ये राज्य करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची नामुष्की ओढावू शकते. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये सध्या मानधनाच्या हिस्सावरून वाद सुरु आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट सीरिजमधून क्रिकेट ऑस्ट्रेलियाला मिळणाऱ्या मानधनाचा ठराविक हिस्सा खेळाडूंना द्यायची मागणी ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशननं केली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशनची मागणी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं फेटाळून लावली आहे. खेळाडूंना हिस्सा दिला तर नवोदित खेळाडूंना घडवण्यासाठी पैसे उरणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं आहे.


येत्या १ जुलैला ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाबरोबरचा करार संपत आहे. त्यामुळे १ जुलैनंतर २०० क्रिकेटपटूंवर बेरोजगार व्हायची टांगती तलवार आहे.


क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये तोगडा निघाला नाही तर भारताविरुद्धची वनडे सीरिज, ऍशेस सीरिज, बांग्लादेशविरुद्धची टेस्ट सीरिज आणि दक्षिण आफ्रिका दौरा संकटात येऊ शकतो. 


याआधी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचेही खेळाडूंसोबत वाद झाले होते. या वादामुळेच गेल, ब्राव्हो आणि पोलार्डसारखे दिग्गज क्रिकेटपटू सध्या वेस्ट इंडिजकडून खेळताना दिसत नाहित.