मेलबर्न : भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लॅबुशेनला ऑस्ट्रेलियाच्या वनडे टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. मार्नस लॅबुशेननं १२ टेस्ट मॅचमध्ये १,१०० पेक्षा जास्त रन केले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात येणार आहे. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. १४, १७ आणि १९ जानेवारीला या ३ वनडे होतील. त्याआधी भारतीय टीम श्रीलंकेविरुद्ध टी-२० मॅचची सीरिज खेळेल.


२५ वर्षांच्या मार्नस लॅबुशेननं १२ टेस्ट मॅचमध्ये ५८.०५ च्या सरासरीने १,१०३ रन केले आहेत यातले १०२२ रन त्याने २०१९ मध्येच केले आहेत. लॅबुशेन यावर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा क्रिकेटपटू आहे. लॅबुशेनने १२ टेस्टमध्ये ३ शतकं आणि ६ अर्धशतकं केली आहेत.


भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने ऍरोन फिंचकडेच नेतृत्व ठेवलं आहे. तर ऍलेक्स केरी आणि फास्ट बॉलर पॅट कमिन्स हे दोघं उपकर्णधार आहेत. वैयक्तिक कारणांसाठी विश्रांती घेणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलची निवड झालेली नाही.


२२ डिसेंबरला भारत वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटची वनडे मॅच खेळणार आहे. या वर्षातली भारताची ही शेवटची मॅच असणार आहे. पुढच्या वर्षी भारतीय टीम श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० सीरिजपासून सुरुवात करेल. ५ जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजला सुरुवात होईल.


ऑस्ट्रेलियाची टीम


ऍरोन फिंच (कर्णधार), ऍलेक्स केरी, पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, पीटर हॅण्ड्सकॉम्ब, सीन एबॉट, केन रिचर्डसन, एश्टन अगर, जॉस हेजलवूड, मिचेल स्टार्क, एश्टन टर्नर, एडम झम्पा