सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभा केला. 50 ओव्हरमध्ये 4 गडी राखून ऑस्ट्रेलियाने 389 रन केले आहेत. भारताविरुद्ध वन-डे क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियाची ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. शुक्रवारी कांगारू संघाने भारताविरुद्ध पहिल्या वनडेत सर्वाधिक धावा केल्या होत्या, परंतु या संघाने एकाच दिवसानंतर आपला जुना विक्रम मोडला. शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 374 धावा केल्या होत्या, त्यामुळे आता त्यांनी 389 धावा बनवून एक नवीन विक्रम केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध वनडे सामन्यात 5 सर्वात मोठे स्कोअर


-389/4 (2020)


-374/6 (2020)


-359/2 (2003)


-359/5 (2004)


-359/5 (2013)


या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि संघाने शानदार सुरुवात केली, तर शेवटी पुन्हा ग्लेन मॅक्सवेलने शानदार डाव खेळला. त्याने 29 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने नाबाद 63 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 389 पर्यंत पोहोचवली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या मार्नस लाबूशाने 61 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 70 धावा केल्या.


वनडे क्रिकेटमध्ये 2013 नंतर सात वर्षांनंतर, पहिल्या पाच फलंदाजांनी संघासाठी 50 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. या सामन्यात डेव्हिड वॉर्नरने 77  बॉलमध्ये  83 धावा केल्या, तर कर्णधार अ‍ॅरोन फिंचने 60 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने 64 बॉलमध्ये 104 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 14 फोर आणि 2 सिक्स मारले. चौथ्या क्रमांकावर लाबूशाने 70 धावा केल्या आणि पाचव्या क्रमांकावर मॅक्सवेलने नाबाद 63 धावांची खेळी केली. या सर्व फलंदाजांच्या आश्चर्यकारक खेळीच्या जोरावर दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एवढी मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळविले.