Shoaib Akhtar On Babar Azam Virat Kohli Comparison: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या (Ind vs Aus) एकदिवसीय क्रिकेट मालिकेमधील शेवटचा सामना आज खेळवला जाणार आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये भारताला पाहुण्या संघाकडून 10 विकेट्सने मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने केवळ 11 षटकांमध्ये भारताने दिलेलं 118 धावांचं लक्ष्य गाठलं. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय फलंदाज सपशेल अपयशी ठरले. केवळ विराट कोहलीने (Virat Kohli) 31 धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या माऱ्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र कोहली वगळता कोणालाही मैदानात तग धरुन राहता आलं नाही. कोहली सुद्धा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विरुद्ध बाजूला जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात एलबीडब्ल्यू झाला.


कोहलीला दिली देवाची उपमा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) विराट कोहलीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. स्पोर्ट्स यारीशी बोलताना शोएब अख्तरने विराटला देवाची उपमा दिली आहे. "विराट इज गॉड," असं शोएब विराटच्या फलंदाजीबद्दल बोलण्यास सुरुवात करतानाच म्हणाला. विराटच्या फलंदाजीसंदर्भात बोलताना त्याच्याकडे क्षमता असल्याने तो चांगलं खेळू शकतो असं म्हटलं. तसेच, "विराट मला आता ऐकत असेल तर मी त्याला एक सांगू इच्छितो की विराट तुला 110 शतकं करायची आहेत. तू वयाच्या 43 व्या वर्षापर्यंत खेळलं पाहिजे," असा सल्लाही शोएबनं दिला आहे.


बाबरबद्दल शोएबचं सूचक विधान


विराटनंतर बाबर आझमबद्दल (Babar Azam) शोएब अख्तरला प्रश्न विचारण्यात आला. बाबर आझमकडे एक खेळाडू म्हणून तुम्ही कसं पाहता, असं शोएबला विचारलं. त्यावर उत्तर देताना शोएबने, "बाबार एक क्लासिक क्रिकेटपटू आहे. ओल्ड स्कूल टाइप क्रिकेटनंतर तो एकदिवसीय सामने खेळला. त्याने आपल्या खेळात बदल केला. त्यानंतर तो आता टी-20 मध्ये स्वत:ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता तो हळूहळू स्वत:ला सर्व फॉरमॅटच्या क्रिकेटसाठी तयार करत आहे. आता स्ट्राइक रेटबद्दल बोलायचं झाल्यास मी त्याच्याबरोबर यासंदर्भात चर्चा केली आहे. आपण स्ट्राइक रेटवरही काम करत असल्याचं त्यानं मला सांगितलं होतं. जर सगळं काही योग्य पद्धतीने घडत गेलं तर विराट जेवढं खेळला तेवढं बाबरही खेळेल. जेवढी शतकं विराटने केली तेवढी शतकं तोसुद्धा (बाबरसुद्धा) बनवू शकतो. (विराटच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो) तो (बाबर) विराटच्या या माइलस्टोनच्याही (विक्रमाच्याही) पुढे जाऊ शकतो," असं मत व्यक्त केलं.


विराट आणि बाबारची शतकं किती?


विराटच्या नावावर सध्या 75 शतकं आहेत. यापैकी 1 शतकं टी-20 मधील आहे. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 46 शतकं साजरी केली आहेत. कसोटीमध्ये कोहलीच्या नावावर 28 शतकं आहेत. दुसरीकडे बाबार आझमबद्दल सांगायचे झाल्यास त्याच्या नावावर एकूण 28 शतकं आहेत. यात एकदिवसीय सामन्यांमधील 19, कसोटीमधील 9 आणि टी-20 मधील 2 शतकांचा समावेश आहे.