Babar Azam ला पुन्हा झोंबल्या मिरच्या; कर्णधारपदावरून प्रश्न विचारताच संतापला खेळाडू
या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बाबर आझमला त्याच्या टेस्टच्या कर्णधारपदावरून प्रश्न विचारण्यात आला. ज्यावरून बाबर संतापलेला दिसला.
Babar Azam got angry : पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यामध्ये तीन सामन्यांची वनडे सिरीजचा पहिला सामना आज म्हणजेच 9 जानेवारी रोजी कराचीमध्ये खेळवण्यात आला. दोन्ही टीम्समध्ये टेस्ट सिरीज (Test Series) 0-0 अशा बरोबरीत सुटली. अशा परिस्थितीत वनडे सिरीज अधिक रंजक होणार आहे. वनडे सिरीजमध्ये न्यूझीलंड टीमचं नेतृत्व केन विलियम्सन करतोय. तर पाकिस्तानची धुरा बाबर आझमकडे (Babar Azam) आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधारांची प्रेस कॉन्फ्रेंस झाली. दरम्यान बाबरसाठी ही फार चर्चेचा विषय ठरली.
या प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बाबर आझमला त्याच्या टेस्टच्या कर्णधारपदावरून प्रश्न विचारण्यात आला. ज्यावरून बाबर संतापलेला दिसला.
एका जर्नलिस्टने बाबरला विचारलं की, तू महान फलंदाजांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे.. मात्र सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि सईद अनवर सारखे खेळाडू, जे महान फलंदाज झाले, ते महान कर्णधार होऊ शकले नाहीत. घरच्या मैदानावर आठपैकी एकंही सामना जिंकला नाही, तर यावरून तुला वाटतं का, की कर्णधारपद सोडून दिलं पाहिजे.
जर्नलिस्टच्या प्रश्नावर संतापला बाबर
हा प्रश्न विचारताच बाबर आझम संतापला आणि म्हणाला, माझ्यामताने सध्या व्हाईट बॉल क्रिकेट सुरु आहे. त्यामुळे त्यासंदर्भात प्रश्न विचारा. मला स्वतःला सिद्ध करू दाखवण्याची गरज नाहीये. मला माहिती आहे मी काय आहे. माझा फोकस केवळ पाकिस्तानसाठी चांगला खेळ करणं आहे.
गेल्या 12 महिन्यांमध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केलेली नाही. 2022 पासून आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेत केवळ एक टेस्ट सामना जिंकला आहे. तर 5 सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे. बाकी सर्व सामने ड्रॉ सुटले.
पाकिस्तानने गेल्या वर्षी त्यांच्या घरी एकही टेस्ट सामना जिंकलेला नाही. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरूद्ध त्यांना सिरीजमध्ये पराभव स्विकारावा लागला. याशिवाय न्यूझीलंडविरूद्ध पाकिस्तानची स्थिती 0-0 ने ड्रॉ झाली.
फलंदाज म्हणून बाबर आझमची कामगिरी
2021-23 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान 38.1 पॉईंट्सच्या टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. यावेळी पाकिस्तानची टीम अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. कर्णधार म्हणून खराब कामगिरी करूनही बाबर आझमने मात्र फलंदाज म्हणून उत्तम खेळ केलाय. बाबर आझमने 2022 मध्ये तिन्ही फॉर्मेट मिळून 2598 रन्स केलेत. 2022 मध्ये बाबरने 8 शतकं आणि 17 अर्धशतके झळकावली आहेत.