मेलबर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या चिंता काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावरची बंदी कायम राहिल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं आहे. यावर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये झालेल्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्यामुळे या तिघांवर बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्मिथ आणि वॉर्नरवर एका वर्षाची आणि बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घातली. यानंतर खेळाडूंची बंदी हटवण्याचे प्रयत्नही झाले. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मात्र त्यांची भूमिका कायम ठेवली. बंदी उठवली तर हे तिन्ही खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमवरचा दबाव वाढेल, असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अंतरिम अध्यक्ष अर्ल एडिंग्स यांनी केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलशी छेडछाड केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एका चौकशी समितीची स्थापना केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय मिळवण्याच्या संस्कृतीमुळे खेळाडू असे वागत असल्याचं या चौकशी समितीच्या अहवालात समोर आलं होतं. यानंतर या तिघांवर बंदी घालण्यात आली. बंदी घातल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशननं(एसीए) क्रिकेट ऑस्ट्रेलियाला खेळाडूंवरची बंदी उठवण्याची मागणी केली होती. एसीएच्या या मागणीचा विचार करू, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितलं. यानंतर आता खेळाडूंवरची बंदी उठवता येणार नाही, असं क्रिकेट ऑस्ट्रेलियानं स्पष्ट केलं.


क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सर्व बाजूंनी विचार केला आहे. हा विचार केल्यानंतर तिन्ही खेळाडूंवर घालण्यात आलेली बंदी हटवता येणार नाही. या निर्णयापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत, असं स्पष्टीकरण क्रिकेट ऑस्ट्रेलियानं दिलं.


स्मिथ आणि वॉर्नरवर बंदीचा हा आठवा महिना आहे. तर बॅनक्रॉफ्टवरची बंदी यावर्षी डिसेंबरमध्ये संपेल. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टी-२० सीरिजला २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया पहिले ३ टी-२० मॅच, मग ४ टेस्ट मॅच आणि ३ वनडे मॅच खेळतील. स्मिथ आणि वॉर्नरवर घालण्यात आलेली बंदी एप्रिल २०१९ साली उठेल. स्मिथ आणि वॉर्नरच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाची टीम कमजोर झाली आहे.


काय होतं नेमकं प्रकरण?


मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केप टाऊनमध्ये झालेल्या टेस्ट मॅचमध्ये बॅनक्रॉफ्ट सॅण्डपेपरनं बॉल घासत होता. बॅनक्रॉफ्ट बॉल खराब करताना दिसल्यावर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमनचं वॉकी-टॉकीवर हॅण्ड्सकॉम्बशी बोलणं झालं. यानंतर हॅण्ड्सकॉम्ब बॅनक्रॉफ्टशी बोलायला गेला. हे बोलणं झाल्यानंतर बॅनक्रॉफ्टनं सॅण्डपेपर खिशात लपवून ठेवला. वाद झाल्यानंतर स्टिव्ह स्मिथनं या सगळ्याची जबाबदारी घेतली. डेव्हिड वॉर्नरनं हा सगळा कट रचल्याचं चौकशीत समोर आलं. डॅरेन लेहमनलाही याप्रकरणामुळे प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला.