भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असून, सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ग्वालियरमध्ये बांगलादेशविरोधातील टी-20 सामन्यातून पदार्पण करणारा मयांक यादव ताशी 150 किमीच्या वेगाने गोलंदाजी करतो. आपल्या वेगवान गोलंदाजीने त्याने बांगलादेशच्या फलंदाजांची चांगलीच दमछाक केली. यावेळी त्याने टाकलेले बाऊन्सर, शॉर्ट चेंडू यांनी सगळ्यांनाच प्रभावित केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयांकने आपल्या पदार्पणातील पहिलीच ओव्हर मेडन टाकली. यानंतर दुसऱ्यात ओव्हरमध्ये त्याने अष्टपैलू खेळाडू महमुदुल्लाह याची विकेट घेतली. मयांक यादवची गोलंदाजी पाहता पुढील दोन सामन्यातही बांगलादेशच्या खेळाडूंना त्याच्याविरोधात संघर्ष करावा लागू शकतो. पण बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतो (Najmul Hossain Shanto) याला मात्र तसं वाटत नाही. मयांक यादवसारख्या गोलंदाजांविरोधात आम्ही नेटमध्ये सराव करतो असं तो म्हणाला आहे. 


"आमच्या नेटमध्ये असेच जलदगती गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला त्याची (मयांक यादव) फार चिंता नाही. पण तो एक चांगला गोलंदाज आहे," असं नजमुल हुसैन शांतोने पहिल्या टी-20 सामन्यातील पराभवानंतर सांगितलं. पहिल्या टी-20 सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने भारत आघाडीवर आहे. 


बांगलादेशच्या टी-20 संघाबद्दल बोलायचं गेल्यास त्यांच्याकडे तस्कीन अहमद वगळता एकही जलद गोलंदाज नाही. तो सलग ताशी 140 किमी वेगाने गोलंदाजी करतो. कसोटी संघात मात्र त्यांच्याकडे नाहीद राणा आहे, जो ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करतो. 


मयंकच्या कामगिरीबद्दल बोलायचं गेल्यास त्याला अखेरच्या ओव्हर्समध्ये काही चौकारांचा फटका बसला. मेहदी हसन मिराझ आणि रिशाद हुसैन यांनी त्याला चौकार लगावले. पण एकंदरीत पाहता त्याने खूप चांगली खेळी केली. मयांकने आपल्या चार षटकांत केवळ 21 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली.


आयपीएल 2024 मध्ये त्याने लखनऊ सुपर जायंट्ससाठी नियमितपणे ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी केली होती. पण दुखापत झाल्याने त्याला विश्रांती घ्याली लागली होती. तेव्हापासून, बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं आहे. 


'आमचे फलंदाज 180 पेक्षा अधिक धावा करु शकत नाहीत'


शांतोने यावेळी त्याच्या संघाला T20 सामन्यात 180 पेक्षा जास्त धावा करायच्या हे माहिती नाही अशी प्रांजळपणे कबुली दिली. काही काळासाठी फलंदाजी हा बांगलादेशचा कमकुवत दुवा आहे.  रविवारी सहा षटकांत 2 बाद 39 अशी स्थिती असताना संघाने 127 पर्यत मजल मारली. भारताने 11.5 षटकांत पल्ला गाठला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.


"आमच्याकडे क्षमता आहे, पण आमच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी जागाही आहे. आम्ही गेल्या 10 वर्षांपासून अशाप्रकारे फलंदाजी करत आहोत. कधीकधी आम्ही चांगली कामगिरी करतो. आम्हाला काही बदल करावे लागतील, कदाचित आम्ही घरी गेल्यावर परत सराव करू," असं तो म्हणाला. बांगलादेशातील खेळपट्टया टी-20 च्या मोठ्या धावसंख्येसाठी अनुकूल नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या सामूहिक फलंदाजीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे असं शांतोला वाटतं.


आम्ही 140 ते 150 धावा होतील अशा खेळपट्टयांवर खेळतो. त्यामुळे आमच्या फलंदाजांना 180 पेक्षा जास्त धावा करण्याचं माहितीच नाही. मी फक्त खेळपट्टीला कारणीभूत धरणार नाही. कौशल्य आणि मानसिकताही महत्त्वाची आहे असं शांतो म्हणाला.