दुबई : बांग्लादेश क्रिकेट टीमने 21 ऑक्टोबर रोजी टी-20 वर्ल्डकपच्या सुपर 12 मध्ये स्थान मिळवलं. त्यांनी पहिल्या फेरीच्या शेवटच्या सामन्यात पापुआ न्यू गिनीचा पराभव केला आणि गटात दुसरं स्थान मिळवलं. या विजयानंतर बांग्लादेशचा कर्णधार महमूदुल्लाहने स्कॉटलंडच्या हातून झालेल्या पराभवानंतर लक्ष्य केलं जात असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महमूदुल्लाह म्हणाला की, बांग्लादेशच्या बांधिलकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. चारही बाजूने होणाऱ्या या टीकेमुळे संघाचं मनोबल घसरलं आहे.


टी -20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात स्कॉटलंडकडून पराभव स्विकारल्याने बांग्लादेश अस्वस्थ झाला होता. त्यानंतर ओमानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, जेव्हा बांग्लादेश संघाने 26 धावांनी विजय मिळवला तेव्हाही अनेकांनी हा विजय संघाच्या हिशोबाने नसल्याचं म्हटलंय. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे नजमुल हसन यांनी सामना गमावल्यानंतर महमुदुल्लाह, शाकिब अल हसन आणि मुशफिकुर रहीम यांच्या कामगिरीवर टीका केल्याचं समजतं.


पापुआ न्यू गिनीचा पराभव केल्यानंतर महमुदुल्लाह पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आम्हाला प्रत्येक बाजूने प्रत्येकाने वाईट ठरवलं आहे. आम्ही माणूस आहोत आणि आम्हालाही भावना आहेत. आमचीही कुटुंबं आहेत. आमचं पालक आणि मुलं टीव्ही पाहतात आणि त्यांना रागही येतो. आजकाल प्रत्येकाच्या फोनमध्ये सोशल मीडिया आहे."


तो पुढे म्हणाला, "जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही टीका देखील समजून घेतो. परंतु जर आम्हाला त्यातून कमी लेखलं जात असल्याने वाईट वाटतं. शाकिब हा बांग्लादेशचा चॅम्पियन खेळाडू आहे. त्याच्यासारखा खेळाडू मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत."


सामन्यादरम्यान आम्ही खूप मेहनत केली पण निकाल आमच्या बाजूने गेला नाही. प्रत्येकाने पूर्ण प्रयत्न केलेत. आम्ही जखमी असतानाही खेळतो. आमच्यापैकी काही जण रोज पेन किलर घेतात. बऱ्याच लोकांना याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आमच्या बांधिलकीबद्दल बोलणं योग्य नाही. टीममध्ये सकारात्मक ऊर्जा आहे आणि त्यासाठी मी संपूर्ण टीमचे आभार मानतो, असंही तो म्हणालाय.