बांगलादेशच्या क्रिकेटपटूवर हुंड्यासाठी बायकोचा छळ केल्याचा आरोप
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूवर त्याच्या बायकोनं आरोप केले आहेत.
ढाका : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीनंतर आता आणखी एका क्रिकेटपटूवर त्याच्या बायकोनं आरोप केले आहेत. बांगलादेशचा मधल्या फळीतील बॅट्समन मोसदक हुसेनच्या पत्नीनं हुंड्यासाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. सहा वर्षांपूर्वी मोसदक हुसेन आणि शरमीन समीरा उषा यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर लगेचच या दोघांमध्ये भांडणं व्हायला लागली. १५ ऑगस्टला मोसदक यानं पत्नीकडे १० लाख टका(बांगलादेशचं चलन) द्यायची मागणी केली. पत्नीनं याला नकार दिल्यामुळे मोसदकनं तिला मारहाण करून घराबाहेर काढलं, असा दावा शरमीनच्या वकिलांनी न्यायालयात केला आहे.
ढाक्याच्या न्यायालयानं या प्रकरणाची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. मोसदकच्या भावानं शरमीननं केलेले हे आरोप फेटाळून लावले आहेत. मोसदकनं शरमीनला घटस्फोटाची नोटीस पाठवली. या दोघांमध्ये पोटगीची रक्कमही ठरली. पण यानंतर शरमीननं जास्त रकमेची मागणी केल्यामुळे तिनं मोसदकवर आरोप केल्याची प्रतिक्रिया मोसदकचा भाऊ मोसाबर हुसेननं दिली आहे. मोसदकनं आत्तापर्यंत बांगलादेशकडून २१ वनडे, ८ टी-२० आणि २ टेस्ट मॅच खेळल्या आहेत.