धोनीने `त्या` एका उपकाराची परतफेड करण्यासाठी करोडो रुपये नाकारले; `हा` किस्सा ऐकून मन भरेल
महेंद्रसिंग धोनीने आपल्या करिअरच्या सुरुवातीला फक्त BAS स्टिकर लावले होते. यावेळी त्याने करोडोंचे कॉन्ट्रॅक्ट नाकारले होते. संघर्षाच्या काळात पहिली बॅट स्पॉन्सरशिप देणाऱ्याच्या उपकाराची परतफेड करण्याच्या हेतूने धोनीने हा निर्णय घेतलाहोता.
महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे यात काही दुमत नाही. धोनी आज भारतीय क्रिकेट संघात नसला तरीही त्याचे करोडो चाहते आहेत. याचं कारण महेंद्रसिंग धोनी हा फक्त चांगला क्रिकेटर नाही, तर एक उत्तम माणूसही आहे. धोनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नसला तरी आगामी आयपीएल हंगामासाठी कसून सराव करत आहे. धोनीला पुन्हा मैदानात खेळताना पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. यादरम्यान आयपीएलसाठी सराव करताना त्याने बॅटवर मित्राच्या दुकानाचं नाव असणारं स्टिकर लावल्याचा फोटो व्हायरल झाला. यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला. पण धोनीने आपल्याला संघर्षाच्या काळात मदत केलेला तो एकमेव मित्र नाही.
धोनीने आपल्याला मदत करणाऱ्याचे उपकार फेडण्यासाठी करोडो रुपये नाकारल्याचं समोर आलं आहे. धोनीने करिअरला सुरुवात केली तेव्हा त्याला सर्वात प्रथम बॅटची स्पॉन्सरशिप देणाऱ्यासाठी असं काही केलं ज्याचं कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. धोनीने भारतीय संघात आल्यानंतर बॅटची निर्मिती करणाऱ्या BAS चे स्टिकर हेतूपूर्वक लावले होते.
सोशल मीडियावर BAS चे मालक सोमी कोहली यांच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये त्यांनी धोनीने सुरुवातीच्या काळात त्याला केलेल्या मदतीसाठी आपल्या कंपनीचं स्टिकर बॅटवर लावत करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट नाकारले असा खुलासा केला आहे.
"धोनीने पैशांचा कोणताही उल्लेख केला नाही. त्याने मला तुमचे स्टिकर बॅटवर लावा आणि मला पाठवा असं सांगितलं. मी त्याला समजावण्याचा फार प्रयत्न केला. तू करोडो रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट हातातून घालवत आहेस असं मी त्याला समजावलं. पण त्याने ते सर्व कॉन्ट्रॅक्ट धुडकावून लावले. मी त्याची पत्नी साक्षी, वडील, आई यांच्याकडेही विनंती केली. मी त्याचा सीए आणि पमरजीत सिंगशीही संवाद साधला. वर्ल्डकपच्या आधी ते सर्वजण त्याच्या घरी गेले होते. पण त्याने नकार देत हा माझा निर्णय असल्याचं सांगितलं," अशी माहिती सोमी कोहली यांनी दिली आहे.
आयपीएलमध्ये मित्राच्या दुकानाचं स्टिकर बॅटवर लावून खेळणार
धोनी (MS Dhoni) सध्या आयपीएलसाठी (IPL 2024) सराव करत असून नेट्समध्ये सराव करताना त्याच्या बॅटवरील नव्या स्टिकरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या स्टिकरवर 'प्राइम स्पोर्ट्स' लिहिलं आहे. पण हे कोणत्याही कंपनी किंवा ब्रँडचं प्रमोशन नाही, तर धोनीच्या बालमित्राच्या दुकानाचं नाव आहे. रांचीमध्ये धोनीचा बालमित्र परमजीत सिंग यांचं स्पोर्ट्सचं दुकान आहे. यानंतर धोनीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
धोनीला परमजीत यांच्या मदतीमुळे 2000 च्या सुरुवातील पहिली बॅट स्पॉन्सरशिप मिळाली होती. आयपीएल 2024 धोनीचा शेवटचा हंगाम असू शकतो अशी चर्चा आहे. म्हणूनच धोनी कदाचित मैदानावरुन निरोप घेताना त्या शेवटच्या क्षणांमध्ये मित्राला शक्य ती मदत करताना दिसत आहे. मित्राच्या दुकानातील विक्री वाढावी यासाठी त्याने परमजीत यांच्या दुकानाच्या नावाचं स्टिकर बॅटवर लावलं आहे.
धोनीच्या या कृत्यामुळे परमजीत सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. आम्हाला जेव्हा कधी गरज लागते तेव्हा तो उपलब्ध असतो असं त्यांनी सांगितलं आहे. धोनीने यावेळी परमजीत यांनी आपली स्वाक्षरी असणारी बॅटही भेट म्हणून दिली आहे. यावर त्याने "Best wishes Chotu Bhaiya" असा संदेशही लिहिला आहे. "मला त्याचा फार अभिमान वाटत आहे. तो नेहमीच आमच्यासाठी उपलब्ध असतो. ही आमची मैत्री नंबर 1 आहे," असं परमजीत म्हणाले आहेत.