मुंबई : टीम इंडियाचे 2 संघ (Indian Cricket Team) एकाचवेळी इंग्लंड आणि श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अजिंक्यपदासाठी भिडणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यावर रवी शास्त्री हे मुख्य प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत जाणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचे युवा खेळा़डू श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे या युवा खेळाडूंसोबत प्रशिक्षक म्हणून कोण जाणार, याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. मात्र आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि (National Cricket Academy)  नॅशनल क्रिकेट अकादमी प्रमुख (Rahul Dravid) राहुल द्रवि़डची श्रींलका दौऱ्यासाठी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. (BCCI Appointed Nca Chief Rahul Dravid to coach Indian team on Lanka tour 2021)    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"टीम इंडियाचा कोचिंग स्टाफ युकेमध्ये असणार आहे. याचा सर्वाधिक फायदा हा युवा खेळाडूंना होणार आहे. द्रविडच्या अनुभवाचा लाभ हा नव्या आणि युवा खेळाडूंना होणार आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने एएनआयला दिली.


द्रविडची प्रशिक्षक म्हणून कामगिरी


द्रविडने याआधी भारत ए संघासोबत कोच म्हणून सूत्र सांभाळली आहेत. द्रविडने 2016-19 पर्यंत टी इंडिया-ए (India-A Team)  आणि अंडर-19 टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पा़डली आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने 2016 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप जिंकण्याची कामिगिरी केली होती. तर 2018 मध्ये भारत उपविजेता राहिला होता. त्यानंतर बीसीसीआयने द्रविडची  2019 मध्ये एनसीएच्या संचालक पदी निवड केली. द्रविडची सीनिअर टीमसोबत जोडल्या जाण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी द्रविड टीम इंडियासोबत 2014 च्या इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा बॅटिंग सल्लागार म्हणून सोबत गेला होता.  


टीम इंडियाचा श्रीलंका दौरा


टीम इंडिया या दौऱ्यासाठी 5 जुलैला श्रीलंकेत दाखल होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया वनडे आणि टी 20 सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3 सामने खेळवण्यात येणार आहे. 13, 16 आणि 19 जुलैला वनडे सामने खेळवण्यात येणार आहेत. तर त्यानंतर 22, 24 आणि 27 जुलैला टी 20 मॅच खेळवल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्व सामन्यांचे आयोजन कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे.


 
दरम्यान अजूनही बीसीसीआयकडून या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली नाहीये. मात्र या दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना संधी मिळणार आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनला नेतृत्वाची संधी मिळू शकते.          


टीम इंडियाचा संभाव्य संघ


पृथ्वी शॉ, शिखर धवन, देवदत पडिक्कल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन, मनिष पांडे, ऋतुराज गायकवाड, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, राहुल तेवतिया, शिवम दुबे, विजय शंकर, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, खलील अहमद, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्ती, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर.