मुंबई : बीसीसीआयने एमएस धोनीला आणखी एक झटका दिला आहे. वर्षाच्या सुरुवातीला बीसीसीआयने धोनीच्या वार्षिक कराराचं नुतनीकरण केलं नाही. यानंतर आता बीसीसीआयने आपल्या सोशल नेटवर्किंगच्या पोस्टरवरुनही धोनीला बाहेर केलं आहे. मागच्यावर्षी जुलै महिन्यात वर्ल्ड कपमध्ये धोनी शेवटचा खेळला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धोनी क्रिकेटपासून लांब असला तरी त्याने अजून निवृत्तीची घोषणा केलेली नाही. ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये माझं पुनरागमन होऊ शकतं, असे संकेत धोनीने दिले होते. भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीनेही धोनी पुनरागमन करु शकतो, असं सांगितलं होतं.


बीसीसीआयने इन्स्टाग्रामवर टीम इंडियाचे १३ मिलियन फॉलोअर झाल्याचा फोटो शेयर केला आहे. या फोटोमधून धोनी गायब आहे. टीम इंडियाच्या या पोस्टरमध्ये एकूण ९ क्रिकेटपटू आहेत. 



इन्स्टाग्रामवरच्या या पोस्टरवर धोनी नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत. धोनीच्या फॅन्सनी ठरवलं तर १३ मिलियनचे एका झटक्यात ३ मिलियन होतील, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.


टीम इंडियाच्या या पोस्टरमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आहेत. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना आणि पूनम यादव दिसत आहेत '१३ मिलियनचा मजबूत परिवार, तुमचं प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद', असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे.