मुंबई : कोरोनामुळे आयपीएलचा 14 वा (IPL 2021) मोसम 29 सामन्यानंतर स्थगित करावा लागला. त्यानंतर आता उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी बीसीसीआय (BCCI) जोरदार हालचाली करत आहे. बीसीसीआय या उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये करण्यासाठी आग्रही आहे. बीसीसीआयचे अंतरिम सीईओ आणि आयपीएलचे (Chief Operating Officer) हेमांग अमीन (Hemang Amin) यांनी उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी 2 शेड्युल तयार केले आहेत. (BCCI has two plans for remaining IPL 2021 matches can be announced on 29th may)
   
TOI नुसार, हेमांग अमीन यांनी टीम इंडियाचा इंग्लंड दौरा आणि यूएईमधील आयोजन या 2 गोष्टी विचारात घेत हे शेड्युल तयार केले आहेत. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात भिडणार आहे. त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित सामने यूएईमध्ये खेळवणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीने सोयीचं आहे. त्यामुळे हे 2 शेड्युल केलं असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे नक्की या सामन्यांचं आयोजन कुठे करायचं याबाबतचा अंतिम निर्णय हा बीसीसीआय घेणार आहे. याबाबतचा निर्णय हा 29 मे रोजी बीसीसीआयच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यूएईचं नाव आघाडीवर


या सामन्यांच्या आयोजनासाठी यूएईचं नाव आघाडीवर आहे. यामागे कारणही तसंच आहे. यूएईमध्ये आयपीएलच्या 13 व्या पर्वाचं यशस्वीरित्या आयोजन केलं होतं. त्यानंतर 14 वा मोसमही तिथेच करण्यात यावा, अशी जोरदार मागणी क्रिकेट वर्तुळातून करण्यात आली. मात्र बीसीसीआयने 14 वा मोसम भारतात खेळवण्याचं ठरवलं. या 14 व्या मोसमाचं आयोजन भारतातील विविध 6 शहरांमध्ये करण्यात आलं.


यामुळे खेळाडूंना कोरोनातही अनावश्यक प्रवास करावा लागला. प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. तर 13 व्या मोसमात यूएईमध्ये दुबई, अबुधाबी आणि शारजाह या 3 शहरातच नियोजन केलं गेलं होतं. त्यामुळे कोरोनाचा धोका असतानाही यूएईमध्ये यशस्वीरित्या 13 वा मोसम पार पडला. त्यामुळे यूएईला यजमानपदाचा मान मिळण्याची शक्यता जास्त आहे.


बीसीसीआयला 31 सामन्यांचे आयोजन इंग्लंडमध्ये करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. कारण यूएई आणि इंग्लंडमधील हॉटेलच्या दरात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. तर इंग्लंडमध्ये सप्टेंबर महिन्यात पावसाळी वातावरण असतं. पावसामुळे सामन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतं. यामुळे बीसीसीआयला सर्वच बाबींचा विचार करता इंग्लंडच्या तुलनेत यूएई हाच पर्याय सर्वोत्तम आहे. त्यामुळे 29 मे रोजी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.