भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर टी-20 संघाच्या नव्या कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव अद्याप कर्णधारपदासाठी अंतिम करण्यात आलेलं नाही. टी-20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्या भारतीय संघाचा उपकर्णधार होता. यावेळी हार्दिक पांड्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण सध्याच्या घडीला बीसीसीआयला कर्णधार ठरवताना फारच अडचणींचा सामना करावा लागत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बोर्ड आणि निवड समिती यांचं एकमत होत नाही आहे. यामागे हार्दिक पांड्याचा फिटनेस कारणीभूत आहे, जो नेहमी संशयाच्या भोवऱ्यात असतो. हार्दिक पांड्याने टी-20 वर्ल्डकपच्या प्रत्येक सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी केली असली तरी बोर्ड अधिकारी हार्दिक पांड्याला कर्णधार कऱण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. यामागील मुख्य कारण फिटनेस आहे.


हार्दिक पांड्याला आपल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक दुखापतींचा सामना करावा लागला आहे. या दुखापती इतक्या आहेत की त्याने कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय खेळतानाही त्याच्यावर जास्त भार पडणार नाही याची काळजी घेतली जाते. एकदिवसीय वर्ल्डकपमध्येही दोन सामन्यानंतरच त्याला दुखापतीमुळे बाहेर पडावं लागलं होतं. त्याला पूर्ण फिट होण्यासाठी पाच महिने लागले होते. याचा फटका त्याच्या टी-20 नेतृत्वाला बसला आहे. याचं कारण नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2023 दरम्यान तो भारतीय संघाचा कर्णधारच आहे. 


त्यामुळे बीसीसीआयला पूर्णपणे फिट कर्णधार हवा आहे, ज्याला मध्यात मालिका सोडावी लागणार नाही. बीसीसीआय सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, "ही एक नाजूक बाब आहे. वादाच्या दोन्ही बाजूंनी युक्तिवाद आहे आणि यामुळे त्यामुळे एकमत झालेलं नाही. हार्दिकचा फिटनेस हा एक मुद्दा आहे पण त्याने आयसीसी ट्रॉफी जिंकत विजयात मोलाचा वाटा उचलला आहे".


या स्पर्धेत सूर्यकुमार यादवही आहे. रोहित आणि कोहलीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो टी-20 मधील पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने एकदिवसीय वर्ल्डकपनंतर आपण नेतृत्व करण्यात सक्षम असल्याचं सिद्ध केलं आहे. “सूर्यकुमारच्या कर्णधार शैलीला ड्रेसिंग रूमकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे,” असं सूत्राने सांगितलं. रिपोर्टनुसार, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचं मत अंतिम निर्णय घेण्यात महत्वाची भूमिका निभावणार आहे. गौतम गंभीरने कोलकाताकडून खेळताना सूर्यकुमारसह खेळण्याचा अनुभव घेतला आहे.