IPL T10 League : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला आता फक्त हातावर मोजण्याइतके दिवस उरले आहेत. येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहे. लोकसभा निवडणूक असल्याने यंदाची आयपीएल दोन टप्प्यात होणार आहे. अशातच पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (CSK vs RCB) यांच्यात होणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच आता आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ (Arun Dhumal) यांनी मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे आता वर्षातून दोनवेळा आयपीएल खेळवली जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी टेलीग्राफसोबत बोलताना आगामी काळात टी-10 सामने खेळवली जाऊ शकते, याचे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून टी-10 लीगची चर्चा सुरू होती. टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी देखील एका वर्षात दोन आयपीएल होऊ शकते, असं वक्तव्य केलं होतं. आयपीएलची लोकप्रियता लक्षात घेता एका वर्षात लवकरच दोन आयपीएलचे आयोजन केले जाऊ शकते, असं शास्त्री म्हणाले होते. त्यामुळे आता क्रिकेटला नवा रंग दिला जाणार का? असा सवाल उपस्थित होत होता. त्यावर आता अरुण धुमाळ यांनी स्पष्ट शब्दात समीकरण मांडलं आहे.


काय म्हणतात अरुण धुमाळ?


आगामी पाच हंगामात आम्ही मीडिया अधिकारांमध्ये, आम्ही पहिल्या दोन हंगामात 74 सामन्यांची योजना आखतोय. तर नंतरच्या दोन हंगामात हळूहळू आम्ही 84 सामन्यांपर्यंत योजना तयार करू, जर आम्हाला जर विंडो मिळाली तर आम्ही 94 सामन्यांचं रोडमॅप देखील आखू शकतो, असं धुमाळ म्हणतात. आम्हाला 84 आणि नंतर 94 सामन्यांसाठी एक विंडो शोधण्याची गरज आहे, असं म्हणत अरूण धुमाळ यांनी एकाच वर्षात दोन आयपीएल खेळवण्याचे संकेत दिले आहेत.


जर विंडो उपलब्ध असेल तरच आपण अशा प्रकारे योजना तयार करु शकतो. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचं वेळापत्रक आणि द्विपक्षिय मालिका यांच्यातील मध्यमार्ग काढावा लागेल. जर क्रिकेटसाठी याचं योगदान मिळत असेल तर नक्कीच यावर लक्ष देऊ, असं अरुण धुमाळ यांनी म्हटलं आहे. 


दरम्यान, काळानुरूप क्रिकेटचं चित्र बदलत गेलं. कसोटी क्रिकेटपासून वनडे क्रिकेची सुरूवात... त्यानंतर आलेलं टी-ट्वेंटी क्रिकेटचं क्रेझ अन् आता टी-10 सामन्याचं फ्याड.. त्यामुळे आता आगामी काळात 10 ओव्हरचे सामने खेळाडूंची कसोटी घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.