कोरोनाला दूर कसं ठेवाल, टीम इंडियाचे हे भन्नाट फोटो पाहाच
BCCIचा अनोखा फंडा एकदा पाहाच....
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगभरात कोरोना Corona व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची हाक देण्यात आली. पंतप्रधानांनी दिलेली ही हाक पाहता देशवासियांनीसुद्धा चांगला प्रतिसाद दिला. पण, काही ठिकाणी मात्र अद्यापही याविषयीचं गांभीर्य पाहायला मिळत नाही. त्यामुळे आता थेट बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडूच खेळाडूंच्या सहाय्याने नागरिकांना या लॉकडाऊनप्रती मोलाचं मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना थेट खेळाडूंच्या मदतीनेच हे परिणामकारक मार्गदर्शन केलं गेलं आहे. ज्यामध्ये विविध सामन्यांमधील खेळाडूंचे आणि सामन्यातील काही क्षणांचे फोटो पोस्ट करत त्यासोबतच्या कॅप्शनमधून मार्गदर्शनाचे मुद्दे अधोरेखित करण्यात आले आहेत.
कोरोनाशी कसा लढा द्याल, असा प्रश्न उपस्थित करत आणि सोबत महेंद्रसिंह धोनीचा फोटो पोस्ट करत बीसीसीआयने याची सुरुवात केली. पुढे घरातच राहा, बाहेर जायचं झाल्यास सुरक्षित अंतर पाळा, हात कायम स्वच्छ ठेवा, घरातल्या कामांमध्ये मदत करा, महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा असे सर्व संदेश पोहोचवण्यासाठी तसेच प्रभावी फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
सध्याच्या घडीला संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचं थैमान वाढत आहे. लाखोंच्या संख्येने या व्हायरसची लागण झाली असून, अनेकांचा यात मृत्यू झाला आहे. एकंदर परिस्थिती ही चिंतेत टाकणारी असली तरीही स्वयंशिस्तीनेच या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे गरज आहे ती म्हणजे अतिशय गांभीर्याने स्वयंशिस्त पाळण्याची आणि कोरोनावर मात करण्याची.