मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातले राजकीय आणि क्रिकेट बोर्डांचे संबंध गेल्या काही दिवसांमध्ये जास्तच खराब झाले आहेत. याचा परिणाम आशिया-११ विरुद्ध जागतिक-११ या मॅचवर होणार आहे. बांगलादेशचे संस्थापक बंगबंधू या नावाने प्रसिद्ध असलेल्या शेख मुजीबुर रहमान यांची जन्मशताब्दी बांगलादेशकडून साजरी करण्यात येणार आहे. यासाठी आशिया-११ आणि जागतिक-११ या टीममध्ये मॅच होणार आहे. पण या मॅचमध्ये आशिया-११ टीमकडून पाकिस्तानी खेळाडू खेळण्याची शक्यता कमी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने या मॅचला अधिकृत दर्जा दिला असल्याचं बोललं जातंय. पण तरीही पाकिस्तानचा खेळाडू या मॅचमध्ये खेळणं जवळपास अशक्य असल्याची माहिती आहे. आशिया-११ टीमकडून भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू एकत्र खेळणार नाहीत. या स्पर्धेसाठी कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रण दिलं जाणार नाही, असं बीसीसीआयचे संयुक्त सचिव जयेश जॉर्ज म्हणाले आहेत.


आशिया-११ टीमकडून कोणते ५ भारतीय खेळाडू सहभागी होतील, याचा निर्णय बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली घेतील, असं जयेश जॉर्ज यांनी स्पष्ट केलं आहे.


एहसान मणींची मुक्ताफळं


भारतातली सुरक्षा पाकिस्तानच्या सुरक्षेपेक्षा जास्त खराब असल्याचं वक्तव्य पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी केलं होतं. यावरून बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये वाद झाले होते. बीसीसीआयनेही एहसान मणींच्या या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं.


एहसान मणी यांनी पहिले स्वत:च्या देशातल्या सुरक्षेवर लक्ष द्यावं. आम्ही आमच्या देश सुरक्षित ठेवण्यासाठी सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयचे उपाध्यक्ष माहिम वर्मा यांनी दिली.


बहुतेक काळ इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एहसान मणींनी भारतातल्या सुरक्षेविषयी बोलणं अयोग्य आहे. भारतच काय पाकिस्तानच्या सुरक्षेविषयी बोलायलाही एहसान मणी पात्र नाहीत. एहसान मणी पाकिस्तानमध्ये जास्त काळ थांबले, तर त्यांना तिकडची खरी परिस्थिती कळेल, अशी टीका बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमळ यांनी केली.


राशिद लतीफकडून टीका


पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि विकेट कीपर राशिद लतीफ याने सौरव गांगुलीच्या चार देशांच्या सुपर सीरिजवर टीका केली होती. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि आणखी एका देशामध्ये सुपर सीरिज खेळवली जाईल, असं वक्तव्य गांगुलीने केलं होतं. गांगुलीचा हा प्रस्ताव म्हणजे बकवास असल्याचं राशिद लतीफ म्हणाला होता.