मुंबई : आयपीएलच्या (IPL 2021) चौदाव्या हंगामाचा दुसरा टप्पा आता चुरशीच्या टप्प्यावर आला आहे. प्लेऑफ गाठण्यासाठी प्रत्येक सामना महत्वाचा ठरतोय. कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलचा दुसरा टप्पा यूएईत (UAE) खेळवला जातोय. प्रत्यक्ष स्टेडिअमवर 50 टक्के प्रेक्षकसंख्येला मर्यादा असली तरी आयपीएलच्या लोकप्रियतेत जराही घट झालेली नाही. यंदा टेलिव्हिजनवरच्या प्रेक्षकसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी स्पर्धेला पाठिंबा दिल्याबद्दल क्रिकेट चाहत्यांचे आभार मानले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय शाह यांनी एक ट्विट केलं आहे, यात त्यांनी म्हटलं आहे 'मला माहिती शेअर करताना अतिशय आनंद होत आहे की आयपीएल 2021ची प्रेक्षकसंख्या सातत्याने वाढत आहे. 35व्या सामन्यापर्यंत टेलिव्हिजनवरची प्रेक्षकसंख्या 38 कोटी इतकी होती. गेल्या वर्षी म्हणजे 2020 पेक्षा हा आकडा 1.20 कोटींहून अधिक आहे. सर्वांचे आभार, यापुढचे सामने अधिक रोमांचक होतील'



कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम मे महिन्यात स्थगित करण्यात आला होता. 2 मेपर्यंत एकूण 29 सामने खेळवण्यात आले होते. यानंतर आयपीएलचा दुसरा टप्पा सप्टेंबर महिन्यात यूएईमध्ये सुरु झाला आणि क्रिकेट चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आयपीएलमध्ये आता खऱ्या अर्थाने चुरस सुरु झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


आयपीएलमध्ये आतापर्यंत 43 सामने खेळवण्यात आले आहेत. आयपीएल पॉईंट टेबलमध्ये एमएस धोणीची चेन्नई सुपर किंग्स (CSK) 16 पॉईंटसह पहिल्या स्थानावर आहे. तर दिल्ली कॅपिटल्स (DC) दुसऱ्या स्थानावर आहे.