IPL 2022 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यासंदर्भात BCCI चा मोठा निर्णय
इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या अंतिम आणि प्लेऑफच्या सामन्यांबाबत बीसीसीआयने महत्त्वाची घोषणा केली आहे.
मुंबई : इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या अंतिम आणि प्लेऑफच्या सामन्यांबाबत बीसीसीआयने महत्त्वाची घोषणा केली आहे. शनिवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या प्लेऑफचे सामने कोलकाता आणि अहमदाबादमध्ये खेळवले जाणार असल्याचं सांगितलं. या दरम्यान प्रेक्षकांच्या संख्येवर कोणतंही बंधन राहणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय.
IPL 2022 चा पहिला प्लेऑफ (24 मे) आणि एलिमिनेटर (26 मे) कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर होणार आहे. तर दुसरा प्लेऑफ (27 मे) आणि अंतिम सामना 29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
याशिवाय बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यंदाच्या महिला टी-20 चॅलेंजर्सच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. 24 ते 28 मे दरम्यान लखनऊच्या स्टेडियमवर तीन टीम्समध्ये सर्व सामने खेळवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दीर्घकाळानंतर आयपीएल सामन्यांमध्ये 100 टक्के प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहणार असल्याची घटना घडणार आहे. कोरोनामुळे आयपीएलमध्ये सुरुवातीला 25 टक्के प्रेक्षकांसह मान्यता मिळाली होती. मात्र दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 50 टक्के करण्यात आली.
कोरोनामुळे यावेळी आयपीएलचे लीग सामने फक्त चार स्टेडियममध्ये आयोजित केले गेले आहेत. सर्व साखळी सामने मुंबईतील तीन स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए स्टेडियमवर सुरु आहेत. यावेळी सर्व टीम्स बायो-बबलमध्ये असून नियमांचं पालन करत आहेत.