मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्येही कोरोनाने एन्ट्री केली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीममध्ये एकूण 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यानंतर मात्र आता बीसीसीआय हाय अलर्टवर आलं आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. कोरोनाचा धोका पाहता बीसीसीआयने या सामन्याची जागा बदलली आहे. 


बीसीसीआयकडून बुधवारी याची माहिती देण्यात आली. यानुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. यापूर्वी 22 एप्रिल रोजी होणारा हा सामना पुण्यातील एमसीए मैदावनावर खेळवला जाणार होता. 


दिल्ली कॅपिटल्समध्ये बुधवारी सहाव्या कोरोनाच्या प्रकरणाची नोंद करण्यात आली. न्यूझीलंडचा क्रिकेटर टिम सिफर्ट याला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. कोरोना झालेला तो दुसरा खेळाडू आणि सहावा सदस्य आहे.


दिल्ली कॅपिटल्सची टीमला 20 एप्रिल रोजी दोन वेळा कोरोना टेस्ट कराव्या लागल्या. यानंतर कालचा पंजाब किंग्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना खेळवला गेला. या सामन्याचा वेन्यूही बदलण्यात आला होता. हा सामना देखील पहिल्यांदा पुण्यात खेळवला जाणार होता, मात्र नंतर तो मुंबईत खेळवण्यात आला. 


टिम सिफर्टपूर्वी दिल्लीच्या मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्या शिवाय इतर चार सपोर्ट स्टाफचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळले होते. मात्र याचा परिणाम 20 एप्रिल रोजीच्या सामन्यावर झाला नाही. या सामन्यात दिल्लीने पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.