चाहत्यांमुळेच कोट्यधीश झालात, बीसीसीआयनं कोहलीला झापलं
भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर देश सोडून जा म्हणणाऱ्या विराट कोहलीला बीसीसीआयनं चांगलंच झापलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटपटू आवडत नसतील तर देश सोडून जा म्हणणाऱ्या विराट कोहलीला बीसीसीआयनं चांगलंच झापलं आहे. चाहत्यांमुळेच भारतातलं क्रिकेट समृद्ध झालं आहे. चाहत्यांनी क्रिकेट बघणं सोडलं तर कोणतीच कंपनी तुमच्याबरोबर १०० कोटी रुपयांचा करार करणार नाही. तसंच बीसीसीआयला एक रुपयाही देणार नाही. बीसीसीआयचा महसूल फक्त चाहत्यांमुळेच वाढतो आहे, असं बीसीसीआयचा एक अधिकारी डीएनएशी बोलताना म्हणाला आहे. विराट हा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे पण आता त्यानं सर्वोत्कृष्ट माणूस बनण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया या अधिकाऱ्यानं दिली आहे.
बीसीआयचे खजीनदार अनिरुद्ध चौधरी यांनीही कोहलीच्या या वक्तव्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. बीसीसीआय क्रिकेट चाहत्यांना महत्त्व देतं आणि त्यांच्या मताचा आदर करतं. मला सुनील गावस्कर आवडायचे पण गॉर्डन ग्रिनीज, डेसमंड हेन्स आणि व्हिव्हियन रिचर्ड्स यांची बॅटिंग बघतानाही मला आनंद मिळायचा, असं चौधरी म्हणाले.
सचिन तेंडुलकर, सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, राहुल द्रविड यांच्याबरोबरच मला मार्क वॉ, ब्रायन लारादेखील आवडायचे. शेन वॉर्न हा माझ्यासाठी जगातला सर्वोत्तम स्पिनर होता पण अनिल कुंबळेची बॉलिंग बघताना रोमांच असायचा. कपील देव यांच्याबरोबरच मी रिचर्ड हॅडली, इयन बोथम आणि इम्रान खान यांचाही चाहता होतो, अशी प्रतिक्रिया चौधरींनी डीएनएला दिली.
कोणत्याही देशाचं आणि सीमेचं बंधन न ठेवता क्रिकेटपटूंचा आदर केला पाहिजे, असं चौधरी म्हणाले.
वादानंतर विराट बॅकफूटवर
या सगळ्या वादानंतर विराट बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे. ट्रोलिंग करणं माझ्यासाठी नाहीये मित्रांनो.. मी स्वत: ट्रोल झाल्यामुळे संतुष्ट आहे. 'हे भारतीय' अशा पद्धतीनं सोशल नेटवर्किंगवर कमेंट करणाऱ्यांबद्दल मी बोललो होतो. मी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. मित्रांनो सणांचा आनंद घ्या आणि मजा करा. सगळ्यांनी शांत राहा, असं ट्विट विराटनं केलं आहे.
विराट कोहलीला बॅट्समन म्हणून अवाजवी महत्त्व दिलं जातं. त्याच्या बॅटिंगमध्ये काहीच विशेष नाही. भारतीय खेळाडूंपेक्षा इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची बॅटिंग बघणं मी जास्त पसंत करतो, असं सोशल नेटवर्किंगवर एक भारतीय म्हणाला.
विराट कोहलीनं या व्यक्तीची प्रतिक्रिया वाचली. ''माझ्यावर तुम्ही टीका केली तरी मला फरक पडत नाही. पण भारतात राहणाऱ्या एखाद्याला भारतीय खेळाडू आवडत नसतील तर त्यांनी भारतात राहू नये'', असं प्रत्युत्तर विराट कोहलीनं दिलं.
तुम्ही भारतात राहू नका, दुसरीकडे जाऊन राहा. तुम्ही आमच्या देशात राहून दुसऱ्या देशावर प्रेम का करता? असा सवाल विराटनं उपस्थित केला. माझ्यावर टीका केली तरी मला फरक पडत नाही.
दुसऱ्या देशावर प्रेम करायचं असेल तर या देशात राहू नका, असं मला वाटतं. तुम्हाला प्राधान्य ठरवता आलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया विराटनं दिली.