भेळपुरीवाला क्रिकेटरच्या आईला ब्रेकिंग न्यूज सांगत म्हणाला, 6 चेंडूत त्याने...
रणजी करंडकात 10 जानेवारी 1985 मध्ये बडोदा विरुद्ध रवी शास्त्रींनी बडोद्याचा पार्ट टाईम गोलंदाज तिलक राजच्या बोलिंगवर एका ओव्हरमध्ये 6 उत्तुंग सिक्स लगावले होते.
मुंबई : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, माजी खेळाडू आणि समालोचक (Ravi Shashtri) रवी शास्त्री यांचा आज 59 वा वाढदिवस. शास्त्रींनी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष कॉमेंट्रीही केली. एका ओव्हरमध्ये 6 सिक्सचा विषय निघाला की आपल्याला सर्वात आधी युवराज सिंह आठवतो. पण त्याआधी काही वर्षांपूर्वी शास्त्रींनी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स लगावण्याचा कारनामा केला होता.
तेव्हा टीव्ही, वर्तमानपत्र आणि रेडिओ अशी मोजकीच माध्यमं होती. त्यामुळे आपल्या मुलाने एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारण्याचा पराक्रम केला, हे त्यांच्या आईंना दुसऱ्या दिवशी भेळपुरीवाल्याकडून समजलं होतं. याबाबत शास्त्रींनी स्वत: एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला होता. हे आपण शास्त्रींच्या वाढदिवसानिमित्ताने जाणून घेणार आहोत. (Bhelpuriwala had told Ravi Shastri's mother that her son hit six sixes off six balls)
शास्त्रींनी सांगितलेला किस्सा
"बडोद्या विरुद्ध मी द्विशतकी खेळी केली. यानंतर मी त्याच रात्री मित्रांसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी गेलो होतो. पार्टी करुन रात्री 3 वाजता घरी परतलो. घराची डोरबेल वाजवली. आईने दरवाजा उघडला. मला सकाळी 5 वाजता प्रॅक्टिसला जायचंय असं आईला सांगितलं. सामन्यात काय झालं, असं आईने विचारलं. त्यावर सकाळी बातम्या बघ, सर्व समजेल, असं म्हणत मी आत शिरलो. आई सकाळी किराणा घेण्यासाठी बाजारात गेली. तेव्हा भेळपुरीवाल्याने आईला मी एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारल्याचं सांगितल", असं शास्त्री म्हणाले. शास्त्रींनी काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.
रणजी करंडकात 10 जानेवारी 1985 मध्ये मुंबई विरुद्ध बडोदा यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईकडून खेळताना शास्त्रींनी बडोद्याचा पार्ट टाईम गोलंदाज तिलक राजच्या बोलिंगवर एका ओव्हरमध्ये 6 उत्तुंग सिक्स लगावले. शास्त्री असा कारनामा करणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले. शास्त्रींनी या सामन्यात द्विशतकी खेळी केली होती. शास्त्रींनी 123 चेंडूत 13 सिक्स आणि तितक्याच चौकारांसह 200 धावा केल्या होत्या.
शास्त्री 2017 पासून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा 2019 मध्ये शास्त्रींची मुख्य प्रशिक्षकपदी फेरनिवड करण्यात आली. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया सातत्याने चमकदार कामगिरी करत आहे. दरम्यान, टीम इंडिया शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंजिक्यपदासाठी भिडणार आहे. तर त्यानंतर इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.