18व्या ओव्हरमधील भुवीच्या `त्या` जबरदस्त बॉलने नीशमची बॅटच तोडली!
पहिल्या डावातील 18व्या ओव्हरमध्ये एक विचित्र घटना घडली.
रांची : रांचीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-20 सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चांगल्या सुरुवातीनंतर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना आपल्या बाजूने वळवण्यास न्यूझीलंडला अपयश आलं.
पहिल्या डावातील 18व्या ओव्हरमध्ये एक विचित्र घटना घडली. जेव्हा भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमार त्याच्या शेवटच्या ओव्हरमध्ये जेम्स नीशमला गोलंदाजी करत होता, तेव्हा पाचवा चेंडू त्याने फुल लेंथवर टाकला. या चेंडूवर नीशमने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू नीशमच्या बॅटच्या खालच्या बाजूला लागला आणि त्याच क्षणी बॉलसह एक तुकडा उडाल्याचं लक्षात आलं.
नीशमसह, भारतीय खेळाडू आणि कॉमेंट्रिटर्सही काही काळ गोंधळले. मुळात नीशमची बॅट तुटली होती.
या घटनेनंतर जेम्स नीशमचे सहकारी खेळाडूही ड्रेसिंग रुममध्ये अवाक झाले. ड्रेसिंग रुममध्ये बसून टीम साऊथी आणि ट्रेंट बोल्ट आश्चर्याने ही घटना पाहत राहिले.
न्यूझीलंडने भारतासमोर 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. सलामीची जोडी आणि आघाडीच्या फळीतील उत्कृष्ट कामगिरीनंतरही न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.