मुंबई : आयपीएल संपल्यानंतर विराट कोहली काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. इंग्लंड दौऱ्याच्या आधी तयारी करण्यासाठी विराटनं हे पाऊल उचललं आहे. इंग्लंडमधली काऊंटी टीम सरेसोबत विराटनं करार केला आहे. आयपीएल संपल्यावर म्हणजेच जूनमध्ये विराट इंग्लंडला रवाना होईल.


विराटच्या काऊंटी खेळण्याला विरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला काऊंटीमध्ये खेळू दिल्याबद्दल इंग्लंडचे माजी फास्ट बॉलर बॉब विलीस यांनी टीका केली आहे. अशाप्रकारे विराटला काऊंटी खेळण्यासाठी पायघड्या घालणं मुर्खपणाचं असल्याचं विलीस म्हणाले आहेत.


विराट कोहली काऊंटीमध्ये खेळल्यामुळे इंग्लंडमधल्या तरुणांना संधी मिळणार नाही आणि या खेळाडूंवर अन्याय होईल. एवढच नाही तर काऊंटी खेळल्यामुळे विराटला इंग्लंड दौऱ्यातही फायदा होईल, असे आक्षेप बॉब विलीसनं घेतले आहेत. इंग्लंडमध्ये खेळताना विराटला त्रास झाला पाहिजे, त्यामुळे सरेनं विराटसोबत केलेला करार चुकीचा असल्याची टीका विलीसनी केली आहे.


इंग्लंडमध्ये कोहलीचा खराब फॉर्म


२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहली खराब फॉर्ममध्ये होता. या दौऱ्यात विराटला एकही अर्धशतक करता आलं नाही. ५ टेस्ट मॅचमध्ये विराटनं १३.४० च्या सरासरीनं १३४ रन्स केल्या होत्या. या सीरिजमध्ये विराट २ वेळा शून्यवर आऊट झाला होता.


अफगाणिस्तानविरुद्ध विराट कॅप्टन नाही


जूनमध्ये इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळल्यामुळे भारतीय टीमला फायदा होईल, असा विश्वास बीसीसीआयला आहे. जुलैमध्ये भारत ३ वनडे आणि ३ टी-20 मॅच खेळणार आहे. तर ऑगस्टमध्ये पाच टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.


अफगाणिस्तानविरुद्धच्या टेस्टमध्ये विराट कोहली कॅप्टन असणार नाही. विराटऐवजी अजिंक्य रहाणे किंवा रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं. या मॅचमध्ये वॉशिंग्टन सुंदर किंवा युझवेंद्र चहल आणि शार्दुल ठाकूरला टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.


दक्षिण आफ्रिकेतली चूक भारत सुधारणार


दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये भारतीय क्रिकेट टीमनं केलेली चूक इंग्लंड दौऱ्यामध्ये सुधारली जाणार आहे. भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय भारताच्या 'अ' टीमकडून इंग्लंडमध्ये खेळणार आहेत. इंग्लंड लायन्सविरुद्धच्या मॅचमध्ये हे दोघंही मैदानात उतरतील. मुख्य म्हणजे राहुल द्रविड हा भारताच्या ए टीमचा प्रशिक्षक आहे. त्यामुळे राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाचा या दोघांना इंग्लंड दौऱ्यामध्ये नक्कीच फायदा होईल.


ऑगस्टपासून सुरु होणार टेस्ट सीरिज


इंग्लंडविरुद्धची पाच टेस्ट मॅचची सीरिज ऑगस्टपासून सुरु होणार आहे. त्याआधी भारताचा कॅप्टन विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळणार आहेत. आयपीएल संपल्यावर विराट कोहली सरेकडून तर चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मा यॉर्कशायरकडून खेळणार आहेत.


जूनमध्ये भारतीय टीम इंग्लंडला जाणार


१४ जूनला भारत आणि अफगाणिस्तानमध्ये बंगळुरूत टेस्ट मॅच होणार आहे. या टेस्ट मॅचची गणना आम्ही सोप्या मॅचमध्ये करत नाही. तर या मॅचमध्ये चांगली टीम मैदानात उतरेल असं बीसीसीआयनं सांगितलं आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 ट्राय सीरिजसारखी टीम या मॅचमध्ये मैदानात उतरु शकते. भारतीय क्रिकेट टीमच्या दोन बॅच जूनमध्ये इंग्लंडला जाणार आहेत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयनं दिली आहे.


दोन ते चार टेस्ट खेळाडू जूनमध्ये भारताच्या ए टीमसोबत इंग्लंडला जातील. यावेळी राहुल द्रविड त्यांचं प्रशिक्षण करेल. तर अफगाणिस्तान दौऱ्यानंतर आणखी खेळाडू इंग्लंडला रवाना होतील. सात ते आठ खेळाडू जूनमध्येच इंग्लंडमध्ये असतील, अशी माहिती बीसीसीआयनं दिली आहे.