भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. युवराज सिंगच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर सध्या काम सुरु आहे. कॅन्सरवर मात करत पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम करणाऱ्या युवराज सिंगचा संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. एकदिवसीय वर्ल्डकप जिंकण्यात मोलाचा वाटा उचललेल्या युवराज सिंगचा प्रवास अनेक खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. एका रिपोर्टनुसार, टी सीरिजचे भुषण कुमार आणि 200 नॉट आऊट सिनेमाचे रवी भागचंदका या प्रोजक्टसाठी एकत्र येत आहेत. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि अभिनेत्यांची अद्याप निवड झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुषण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज सिंगचं आयुष्य म्हणजे लवचिकता, विजय आणि उत्कटतेची आकर्षक कथा आहे. एक होतकरू क्रिकेटर ते क्रिकेटिंग हिरो आणि नंतर खऱ्या आयुष्यात नायक बनण्याचा त्याचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. ही कथा मोठ्या पडद्यावर सांगण्याची आणि त्या माध्यमातून ऐकण्याची गरज असून त्याच्या विलक्षण कामगिरीचा आनंद साजरा करण्यासाठी मी रोमांचित आहे”.


रवी भागचंदका यांनी युवराज सिंग प्रत्येक बाबतीत महान आहे असं म्हटलं आहे. "युवराज मागील अनेक वर्षांपासून माझा चांगला मित्र आहे. मला अभिमान आहे की त्याने आपला अविश्वसनीय क्रिकेट प्रवास मोठ्या पजद्यावर उलगडण्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवला. युवी हा केवळ विश्वविजेता नाही तर खऱ्या अर्थाने महान खेळाडू आहे,” असं ते म्हणाले आहेत. 


युवराज सिंगने या चित्रपटाने सर्वांना आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रेरणा द्यावी अशी आशा व्यक्त केली आहे. “भूषणजी आणि रवी माझी कथा जगभरातील माझ्या लाखो चाहत्यांना दाखवतील याचा मला खूप सन्मान वाटतो. क्रिकेट हे माझे सर्वात मोठे प्रेम आणि अटी-तटींवर मात करण्यासाठी शक्तीचा स्त्रोत आहे. मला आशा आहे की हा चित्रपट इतरांना त्यांच्या स्वतःच्या आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रेरित करेल,” असं युवराज म्हणाला.


युवराज सिंगने वयाच्या 13  व्या वर्षी पंजाबच्या अंडर -16 संघाकडून खेळत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2007 च्या T20 विश्वचषकादरम्यान, युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात सहा षटकार ठोकत इतिहास रचला होता. युवराजने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.