ब्रेट ली म्हणतो, हा भारतीय T-20 world cup मध्ये करेल सर्वाधिक रन्स
टी-20 वर्ल्डकपमध्ये कोण करणार सर्वाधिक धावा...
मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 चा थरार आता हळूहळू वाढत आहे. या स्पर्धेच्या फेरी 1 चे सामने आता संपणार आहेत आणि लवकरच सुपर 12 च्या सामन्यांना सुरुवात होईल. जेथे अनेक संघ टी-20 विश्वचषक जिंकण्याचे दावेदार आहेत. अशा परिस्थितीत फलंदाज आणि गोलंदाजांची भूमिकाही खूप महत्त्वाची असणार आहे. या फलंदाज आणि गोलंदाजांबद्दल जाणून घेऊया जे या वर्षी सर्वाधिक धावा आणि विकेट घेऊ शकतात.
टीम इंडियाच्या या दोन खेळाडूंमध्ये ताकद
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीचा असा विश्वास आहे की, भारताचा केएल राहुल आणि मोहम्मद शमी टी-20 विश्वचषकातील सुपर 12 टप्प्यात सर्वाधिक धावा करणारा आणि सर्वाधिक विकेट घेणारा क्रिकेटर बनू शकतात. आयपीएल दरम्यान राहुल उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर होता. त्याचा पंजाब किंग्जचा सहकारी शमीने अलीकडच्या काळात इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरीसह चांगली गोलंदाजी केली आहे.
फलंदाज आणि गोलंदाजीमध्ये आक्रमकपणामुळे भारत कदाचित विजेतेपदासाठी अव्वल दावेदार असेल असे ब्रेट लीने म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांची कामगिरी पाहता, माझ्या दृष्टीने केएल राहुल या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू असेल आणि मोहम्मद शमी सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर असेल. त्यामुळे जर ते अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले आणि भारताकडे सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये हे खेळाडू असतील, तर ती एक चांगली सुरुवात असेल. भारतीय उपखंडातील संघ संयुक्त अरब अमिरातीच्या परिस्थितीतही चांगली कामगिरी करतील असा विश्वास ब्रेट लीने व्यक्त केलाय.
ब्रेट लीला आशा आहे की, ऑस्ट्रेलिया त्यांची पहिली टी-20 मॅच जिंकू शकते. ऑस्ट्रेलिया शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. "आम्हाला या फॉरमॅटमध्ये फारसे यश मिळाले नाही, आता ते बदलण्याची वेळ आली आहे पण हे सोपे होणार नाही. विशेषत: जेव्हा तुम्ही इंग्लंड, भारत आणि न्यूझीलंड सारख्या मजबूत संघापुढे खेळत असाल.'