Brian Lara On Calling Virat Kohli Selfish: भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने वर्ल्ड कप 2023 मध्ये दमदार कामगिरी केली. विराट कोहलीने या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले. विराट कोहलीने 700 हून अधिक धावा करत एकाच पर्वात 700 धावा ओलांडणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला आहे. विराटने 11 सामन्यांमध्ये विराटने 765 धावा केल्या. त्याने 95.62 सरासरीने धावा केल्या. विराटने या वर्ल्ड कपमध्ये एकूण 3 शतकं आणि 6 अर्धशतकं झळकावली. विराटला या कामगिरीसाठी वर्ल्ड कप 2023 च्या पर्वाचा मालिकावीर हा पुरस्कारही मिळाला आहे. मात्र विराटच्या एवढ्या धमाकेदार कामगिरीनंतरही तो स्वार्थी असल्याची टीका काही महाभागांनी केली. यामध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचा विद्यमान निर्देशक मोहम्मद हाफिजचाही समावेश आहे. 


माजी पाकिस्तानी कर्णधार काय म्हणालेला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यामध्ये शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानचा माजी फलंदाज असलेल्या मोहम्मद हाफिजने एक वादग्रस्त विधान केलं होतं. "मला विराटच्या फलंदाजीमध्ये स्वार्थीपणा दिसून येतो. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मला तिसऱ्यांदा असं वाटलं. 49 व्या ओव्हरमध्ये तो स्वत:चं शतक पूर्ण करण्यासाठी एक धाव घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याने संघाला प्राधान्य दिलं नाही," असं हाफिज 'टॉप क्रिकेट अॅनालिसीस' या कार्यक्रमामध्ये म्हणाला होता.


ब्रायन लाराचं जशास तसं उत्तर


विराटवर करण्यात आलेल्या या टीकेवर नुकतीच वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि सर्वकालीन श्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या ब्रायन लाराने प्रतिक्रिया नोंदवली आहे. लोक विराटला स्वार्थी म्हणत आहेत असा संदर्भ देत ब्रायन लाराला प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर ब्रायन लाराने स्फोटक उत्तर दिलं. "जे लोक विराटला स्वार्थी म्हणत आहेत, त्याच्याबद्दल या असल्या नको त्या गोष्टी बोलत आहेत त्यांना विराटबद्दल ईर्षा वाटते. ते विराटवर जळतात. माझ्या करिअरमध्येही मी अशा प्रसंगांना सामोरे गेलो आहे. अशी काही आम्ही केलेल्या रन्समुळे कायम द्वेषाने जळत असतात," असं म्हणत ब्रायन लाराने विराट कोहलीला स्वार्थी म्हणणाऱ्यांना सुनावलं. 


त्याला 20 शतकं झळकवावी लागतील


विराट कोहली आता 35 वर्षांचा असून तो आजही क्रिकेट खेळण्यासाठी फारच फिट आहे. असं असलं तरी सचिन तेंडुलकरच्या 100 शतकांचा विक्रम मोडणं विराटला कठीण जाईल असंही प्रांजळपणे ब्रायन लाराने सांगितलं. "विराट किती वर्षांचा आहे? 35, बरोबर ना? त्याची 80 शतकं झाली आहेत त्याला 20 शतकं करावी लागतील. त्याला सचिन तेंडुलकरच्या विक्रमशी बरोबरी करण्यासाठी अजून 4 वर्ष लागतील. विराट तोपर्यंत 39 वर्षांचा झालेला असेल. हे फार कठीण काम आहे," असं लारा म्हणाला.


विराट शतकांचं शतक झळकावेल असं म्हणणं...


"मी ठामपणे नाही सांगू शकत. खरं तर कोणीच सांगू शकत नाही. मात्र जे क्रिकेटसंदर्भातील तर्क वापरत नाही त्यांना सांगू इच्छितो की 20 शतकं फार मोठी गोष्ट आहे. अनेकांना त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये 20 शतकं झळकावता येत नाहीत. विराट हे करु शकतो असं म्हणणं फारच धाडसाचं ठरेल. वय कोणासाठी थांबत नाही. विराट अनेक विक्रम मोडेल पण शतकांचं शतक हा विक्रम त्याने मोडणं कठीण दिसतंय," असं लाराने सांगितलं.