मेलबर्न : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात उतरले. ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, एडम गिलख्रिस्ट, युवराज सिंग हे खेळाडू बुशफायर बॅशची मॅच खेळण्यासाठी आमने-सामने होते. मेलबर्नमध्ये झालेल्या या मॅचमध्ये लारा आणि रिकी पाँटिंग जुन्या ढंगात दिसले. तर शेन वॉटसन आणि एन्ड्र्यू सायमंड्सनेही त्यांचं जुनं रुप दाखवलं. युवराज सिंगला मात्र चमकदार कामगिरी करता आली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या आगीत प्राणी आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. या आगीत प्रभावित झालेल्यांना मदत म्हणून ही चॅरिटी मॅच खेळवण्यात आली. पाँटिंग-११ आणि गिलख्रिस्ट-११ या टीममध्ये ही मॅच झाली. पाँटिंग-११ ने या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करुन १० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १०४ रन केले.


पाँटिंग-११ कडून ब्रायन लाराने ११ बॉलमध्ये सर्वाधिक ३० रन केले. लाराच्या खेळीमध्ये ३ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. नवव्या ओव्हरमध्ये लारा रिटार्यड आऊट होऊन माघारी परतला. कर्णधार रिकी पाँटिंगने १४ बॉलमध्ये २६ रन आणि मॅथ्यू हेडनने १४ बॉलमध्ये १६ रन केले. ल्यूक हॉजने ४ बॉलमध्ये ११ आणि जस्टीन लँगरने ४ बॉलमध्ये ६ रनची खेळी केली. गिलख्रिस्ट-११ कडून युवराज सिंग, कोर्टनी वॉल्श आणि एन्ड्र्यू सायमंड्सने एक-एक विकेट घेतली.


पाँटिंग-११च्या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसन आणि एन्ड्र्यू सायमंड्सने आक्रमक खेळी केली. वॉटसनने ९ बॉलमध्ये ३० रन केले, यामध्ये २ फोर आणि ३ सिक्स होते. सायमंड्सने १३ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने २९ रन केले. गिलख्रिस्टने ११ बॉलमध्ये १७ रनची खेळी केली.


एन्ड्र्यू सायमंड्स खेळत असताना गिलख्रिस्ट-११ ची टीम मॅच जिंकेल, असं वाटत होतं. गिलख्रिस्टच्या टीमला १२ बॉलमध्ये २१ रनची गरज होती. पण दुसऱ्यांना बॅटिंगची संधी द्यायची म्हणून सायमंड्स रिटार्यड आऊट झाला. गिलख्रिस्ट-११ने नवव्या ओव्हरमध्ये ४ रन केले. शेवटच्या ओव्हरमध्ये गिलख्रिस्टच्या टीमला विजयासाठी १७ रन पाहिजे होते.


डॅनियल ख्रिश्चनच्या या ओव्हरमध्ये पहिल्या ५ बॉलवर ७ रन आले. शेवटच्या बॉलवर गिलख्रिस्ट-११ला विजयासाठी १० रन पाहिजे होते. ख्रिश्चनने टाकलेला सहावा बॉल नो बॉल होता. या बॉलवर रिवॉल्टने फोर मारला. शेवटच्या बॉलला ५ रनची गरज असताना रिवॉल्टला ३ रनच करता आले, आणि गिलख्रिस्टच्या टीमला सामना १ रनने गमवावा लागला.


रिकी पाँटिंगच्या टीममध्ये जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन, एलिस विलानी, ब्रायन लारा, फोबे लिचफील्ड, ब्रॅड हॅडिन, ब्रेट ली, वसीम अक्रम, डेन क्रिस्टियन, लुक हॉज होते. सचिन तेंडुलकर या टीमचा प्रशिक्षक होता. 


एडम गिलख्रिस्टच्या टीममध्ये शेन वॉटसन, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, एलेक्स ब्लॅकवेल, एन्ड्र्यू सायमंड्स, कोर्टनी वॉल्श, निक रिवॉल्ट, पीटर सीडल, फवाद अहमद, कॅमरुन स्मिथ होते. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कर्णधार टीम पेन या टीमचा प्रशिक्षक होता.