`टीम इंडिया`च्या निवड समितीची घोषणा लवकरच, ही नावं आघाडीवर
मार्चच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची घोषणा होणार आहे.
नवी दिल्ली : मार्चच्या पहिल्या आठवड्यात टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची घोषणा होणार आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य मदन लाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. काहीच दिवसांपूर्वी मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आर.पी.सिंग या ३ सदस्यांची क्रिकेट सल्लागार समितीवर नेमणूक झाली होती. या तिघांवर निवड समितीसाठीच्या २ सदस्यांची निवड करण्याची जबाबदारी आहे. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यामुळे नव्या सदस्यांची नियुक्ती होणार आहे.
निवड समिती सदस्यांची घोषणा करण्यासाठी तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, पण १ किंवा २ मार्चला ही नावं जाहीर होऊ शकतात, असं मदनलाल यांनी सांगितलं आहे. आमच्याकडे उमेदवारांची यादी आली आहे. या यादीची छाननी झाल्यानंतर आम्ही तिघं बसून निर्णय घेऊ, यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवू, असं मदनलाल म्हणाले.
'भारतीय टीम न्यूझीलंडमधून यायच्याआधी १-२ मार्चपर्यंत आम्ही निवड समितीच्या नावाची घोषणा करु. आम्हाला ही प्रक्रिया लवकर संपवायची आहे, कारण लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे सीरिजही आहे. ही सीरिज १२ मार्चपासून सुरु होणार आहे,' असं वक्तव्य मदनलाल यांनी केलं. सल्लागार समितीची अजून कोणतीही बैठक झालेली नाही, फक्त आम्हाला नावांची यादी मिळाली आहे, असं मदनलाल यांनी स्पष्ट केलं आहे.
भारताचे माजी लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामाकृष्णन आणि माजी फास्ट बॉलर अजित आगरकर निवड समिती अध्यक्ष बनण्याच्या स्पर्धेत आहेत. नियमांनुसार सर्वाधिक टेस्ट मॅच खेळलेल्या खेळाडूला निवड समिती अध्यक्ष बनवलं जातं. सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारा खेळाडू निवड समिती अध्यक्ष होईल, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केलं आहे.
अजित आगरकरने भारताकडून २६ टेस्ट मॅच तर शिवरामाकृष्णन यांनी ९ टेस्ट मॅच खेळल्या आहेत. त्यामुळे अजित आगरकर निवड समिती अध्यक्ष होऊ शकतो. पण आगरकरची निवड झाली तर पश्चिम विभागाचे निवड समितीमध्ये २ सदस्य होतील. पश्चिम विभागाचे जतिन परांजपे हे आधीपासूनच निवड समितीमध्ये आहेत. पण बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आता झोनल पद्धत रद्द करण्यात आली आहे.
एमएसके प्रसाद हे दक्षिण विभाग आणि गगन खोडा मध्य विभागातून निवड समिती सदस्य झाले होते. या दोघांचा कार्यकाळ आता संपला आहे. तर उत्तर झोनकडून सरनदीप सिंग, पूर्व झोनकडून देवांग गांधी आणि पश्चिम झोनकडून जतीन परांजपे यांचा ४ वर्षांपैकी १ वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे.
आगरकर आणि शिवरामाकृष्णन यांच्याशिवाय माजी फास्ट बॉलर व्यंकटेश प्रसाद यांचं नावही उमेदवारांच्या यादीत आहे.