मुंबई : टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांची अखेर घोषणा झाली आहे. क्रिकेट सल्लागार समितीने माजी स्पिनर सुनील जोशी यांच्या नावाची अध्यक्षपदासाठी शिफारस केली आहे. सुनील जोशी यांच्यासोबतच हरवींदर सिंग यांचं नावही देण्यात आलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिली आहे. एका वर्षानंतर या दोघांच्या कामाची समिक्षा केली जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट सल्लागार समितीने सुनील जोशी, हरवींदर सिंग, व्यंकटेश प्रसाद, राजेश चौहान आणि एल शिवरामाकृष्णन या चौघांच्या नावांची ४० उमेदवारांमधून निवड केली होती. एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला असल्यामुळे दोन नवीन सदस्यांची नियुक्ती बीसीसीआयला करणं बंधनकारक होतं. ही निवड समिती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी भारतीय टीमची घोषणा करेल.


जानेवारी महिन्यात बीसीसीआयने मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंग यांची क्रिकेट सल्लागार समितीवर नेमणूक केली होती. समितीचे अध्यक्ष मदन लाल यांनी भारतासाठी ३९ टेस्ट आणि ६७ वनडे मॅच खेळल्या. १९८३ सालचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीममध्येही मदन लाल होते. मदन लाल भारतीय टीमचे प्रशिक्षक आणि निवड समितीचे सदस्यही होते.


आरपी सिंग भारतासाठी १४ टेस्ट आणि ५८ वनडे आणि १० टी-२० मॅच खेळला. २००७ साली टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय टीममध्ये आरपी सिंग होता. सुलक्षणा नाईक भारताकडून २ टेस्ट, ४६ वनडे आणि ३१ टी-२० मॅच खेळल्या.


सुनील जोशी आणि हरवींदर सिंग यांच्यासोबतच सरनदीप सिंग (उत्तर झोन), देवांग गांधी (पूर्व झोन) आणि जतीन परांजपे (पश्चिम झोन) हे कायम आहेत. सरनदीप सिंग, देवांग गांधी आणि जतीन परांजपे यांचा १ वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे. दक्षिण झोनच्या एमएसके प्रसाद आणि मध्य झोनच्या गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला होता.