Rohit Sharma: काम अजूनही अर्धवट...; विजयानंतरही रोहित शर्माने दाखवल्या टीम इंडियाच्या चुका!
Rohit Sharma: न्यूझीलंडकडून डॅरल मिचेलने शतकी खेळी केली. तर टीम इंडियाने 4 विकेट्सने हा सामना जिंकला. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्माने विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं.
Rohit Sharma: भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये रविवारी सामना रंगला होता. तब्बल 20 वर्षांनंतर आयसीसीच्या स्पर्धेत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला आहे. वर्ल्डकपच्या या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 4 विकेट्सने धूळ चारली. या सामन्यात मोहम्मद शमी आणि विराट कोहली खरे विजयाचे शिल्पकार ठरले. दरम्यान सलग 5 विजय मिळवून देखील टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, अजूनही काम पूर्ण झालेलं नाही असं म्हणालाय.
धरमशालाच्या या मैदानावर टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडच्या टीमने 274 रन्सचं लक्ष्य टीम इंडियाला दिलं. न्यूझीलंडकडून डॅरल मिचेलने शतकी खेळी केली. तर टीम इंडियाने 4 विकेट्सने हा सामना जिंकला. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्माने विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला की, टूर्नामेंटची सुरुवात खूप चांगली झाली आहे. मात्र अजूनही काम अर्धवट आहे. आम्हाला संतुलन ठेवणं गरजेचं आहे. आम्ही फार पुढचा विचार करणार नाहीये. शमीने चांगली संधी साधली. त्याला या परिस्थितीचा अनुभव आहे आणि तो दर्जेदार गोलंदाज आहे.
रोहित पुढे म्हणाला, एका क्षणी आम्ही 300 पेक्षा जास्त स्कोअर पाहत होतो. मी माझ्या फलंदाजीचा आनंद घेतोय. मी आणि शुभमन दोघंही भिन्न व्यक्तिमत्त्व आहोत पण आम्ही एकमेकांचं कौतुक करतो. जिंकलो याचा आनंद झाला.
या सामन्यात विराट कोहलीने पुन्हा एकदा टीमला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. विराटविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, विराट कोहलीने इतकी वर्षे आमच्यासाठी असा खेळ केला आहे. आम्ही काही विकेट गमावल्या तेव्हा कोहली आणि जडेजाने आम्हाला सामन्यात कमबॅक करण्यास मदत केली. न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात फिल्डींग फारशी चांगली नव्हती. रवींद्र जडेजा जगातील सर्वोत्तम फिल्डरपैकी एक आहे. आम्हाला माहितीये की, फिल्डींग ही अशी गोष्ट आहे जी पुढे जाणाऱ्या अनेक गोष्टी ठरवू शकणार आहे.
तब्बल 20 वर्षांनी टीम इंडियाचा विजय
20 वर्षांनंतर आयसीसी वर्ल्डकप 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा हा विजय आहे. याआधी 2003 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडचा पराभव करण्यात यश आलं होतं. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय टीमवर सातत्याने वर्चस्व गाजवलं होतं. मात्र यावेळी टीम इंडियाने धर्मशालाच्या मैदानावर शानदार विजय मिळवत हा विक्रम मोडीत काढला आहे.