कर्णधार कोहली आणि पुजाराने केला `हा` विक्रम
पुजाराच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे आणि कोहलीच्या नाबाद ४७ धावांमुळे या दोघांच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे.
मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्टला सुरुवात झाली आहे. दिवसाअखेर भारताचा स्कोअर २१५/२ एवढा आहे. या सीरिजमध्ये वारंवार अपयशी ठरत असलेल्या ओपनर मुरली विजय आणि केएल राहुल यांना या टेस्टसाठी डच्चू देण्यात आला. या दोघांऐवजी मयंक अग्रवाल आणि हनुमा विहारी ओपनिंगला आले. मयंक अग्रवालनं त्याची निवड सार्थ ठरवली. मयंकनं त्याच्या पदार्पणाच्या मॅचमध्येच ८ फोर आणि १ सिक्स मारून ७६ रन केले.
गेल्या अनेक टेस्टमध्ये भारताला ठोस सुरुवात मिळत नव्हती. सलामीच्या खेळाडूंना मोठी धावसंख्या उभारण्यात अडचणी येत होत्या. या मॅचमध्ये भारताची पहिली विकेट ४० रनवर गेली. हनुमा विहारी ८ रनवर आऊट झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या चेतेश्वर पुजारासह मयांकने ८३ रनची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताला मोठी धावसंख्या रचण्यास हातभार लागला. भारताचा स्कोअर १२३ असताना मयांक अग्रवाल ७६ रनवर आऊट झाला. यानंतर आलेल्या कोहलीने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत चेतेश्वर पुजारासह नाबाद ९२ रनची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताचा स्कोअर २ आऊट २१५ असा होता. दिवसाअखेर पुजारा आणि कोहली ६८ आणि ४७ धावांवर नाबाद होते.
कोहली, पुजारा आणि विक्रम
पुजाराच्या नाबाद अर्धशतकी खेळीमुळे आणि कोहलीच्या नाबाद ४७ धावांमुळे या दोघांच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद झाली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक रन करण्याचा भारतीय फलंदांजामधील विक्रम हा अजूनही सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. तेंडुलकरने सर्वाधिक ६७०७ धावा केल्या आहेत. त्या खालोखाल कोहलीने ४७ रनच्या खेळीने दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. त्याने व्ही. व्ही. एस लक्ष्मणला मागे टाकले आहे.
नेहमीप्रमाणेच संयमी खेळी करणाऱ्या पुजाराचा देखील या यादीत समावेश झाला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या सीरिजमध्ये पुजाराने आतापर्यंत तीन अर्धशतकं झळकावली आहेत.
सीरिजच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मॅच
भारताने आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे हा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यावरुन सीरिजचे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही टेस्ट महत्त्वपूर्ण आहे.