ब्रेडा : भारतीय पुरुष हॉकी टीमनं आठ वेळा चॅम्पियन असलेल्या नेदरलॅंडविरुद्धचा सामना १-१नं ड्रॉ केला. यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. भारताची चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल रविवारी १४ वेळा चॅम्पियन झालेल्या ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ५ मॅचमध्ये भारतानं २ विजय, २ ड्रॉ आणि १ पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या खात्यात ८ पॉईंट्स होते. ऑस्ट्रेलियानं ५ मॅचपैकी ३ विजय, १ ड्रॉ, १ पराभव पत्करून १० अंक कमावले. १० अंकांमुळे ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या मंदीप सिंहनं ४७ व्या मिनिटाला गोल केल्यानंतर नेदरलॅंडच्या थिएरी ब्रिंकमेननं ५५ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी केली. पहिल्या हाफमध्ये भारताला दोन तर नेदरलॅंडला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण दोघांनाही याचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये एकही गोल झाला नाही.


५५ व्या मिनिटाला नेदरलॅंडनं गोल केला पण भारतानं रेफरल मागितला. रेफ्रींनी भारताचा हा रेफरल धुडकावून लावला आणि मॅच १-१ बरोबरीत आली. ५८ व्या मिनिटाला नेदरलॅंडनं आणखी एक गोल केला पण यावेळीही भारतानं रेफरल मागितला. हा रेफरल मात्र भारताच्या बाजूनं लागला आणि भारतीय खेळाडूंचा जीव भांड्यात पडला. ५९ व्या मिनिटाला नेदरलॅंडला ३ पेनल्टी कॉर्नर मिळाले तेव्हा भारतासमोर पराभवाचं संकंट दिसत होतं. पण नेदरलॅंडच्या खेळाडूंना एकाही पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही. त्यामुळे रोमहर्षक अशी मॅच भारतानं ड्रॉ करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश केला.