चंडीगड : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मॅचसाठी टीम इंडिया मोहालीमध्ये दाखल झाली आहे. पण चंडीगड पोलिसांनी टीम इंडियाला सुरक्षा द्यायला नकार दिला आहे. बीसीसीआयने सुरक्षा पुरवण्यासाठीचे ९ कोटी रुपये न दिल्यामुळे चंडीगड पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका आणि भारतीय टीमला मोहाली पोलिसांनी विमानतळापासून ते चंडीगड पोलिसांची हद्द सुरु होईपर्यंत सुरक्षा दिली. यानंतर खासगी सुरक्षा रक्षकांनी दोन्ही टीमना त्यांच्या हॉटेलपर्यंत सुखरुप पोहोचवलं.


भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी टी-२० बुधवार १८ सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. या सीरिजची धर्मशालामधली पहिली टी-२० पावसामुळे रद्द झाली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी मोहालीमध्ये पाऊस पडणार नाही. त्यामुळे दुसऱ्या टी-२० मध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशी अपेक्षा आहे.


पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी दोन्ही टीम तयारी करत आहेत. टी-२० वर्ल्ड कपवर लक्ष ठेवून भारताने श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, खलील अहमद, नवदीप सैनी, राहुल चहर, दीपक चहर या नवोदितांना संधी देण्यात आली आहे.