बंगळुरू : ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणारा चेतेश्वर पुजारा काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये सौराष्ट्रकडून खेळताना चेतेश्वर पुजारानं शतकी खेळी केली आहे. पुजाराच्या या खेळीमुळे सौराष्ट्रचा ५ विकेटनी विजय झाला आहे. याचबरोबर सौराष्ट्र रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. कर्नाटकनं ठेवलेल्या २७९ धावांचा पाठलाग करताना चेतेश्वर पुजारानं नाबाद १३१ धावा आणि शेल्डन जॅक्सननं १०० धावांची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकनं ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रच्या सुरुवातीच्या ३ विकेट २३ धावांवर गेल्या होत्या. चौथ्या दिवसाअखेर सौराष्ट्रनं २२४ धावा करून ३ विकेटच गमावल्या होत्या. पुजारा आणि जॅक्सननं सौराष्ट्रची पडझड थांबवली. पुजाराचं प्रथम श्रेणी क्रिकेटमधलं हे ४९वं शतक आहे. तर जॅक्सनचं हे १६वं प्रथम श्रेणी शतक आहे. पुजारानं २६६ बॉलमध्ये १७ फोरच्या मदतीनं नाबाद १३१ धावा केल्या. तर शेल्डन जॅक्सननं २१७ बॉलमध्ये १०० धावांची खेळी केली, यामध्ये १५ फोरचा समावेश होता.


सौराष्ट्रच्या आधी पहिल्या सेमी फायनलमध्ये विदर्भनं केरळचा पराभव करत फायनल गाठली आहे. आता विदर्भ आणि सौराष्ट्रमध्ये ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर रणजी ट्रॉफीची फायनल रंगेल. २०१७-१८ च्या मागच्या मोसमामध्ये विदर्भनं पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. आता पुन्हा एकदा हीच कामगिरी करण्यासाठी विदर्भचा संघ सज्ज झाला आहे. तर दुसरीकडे सौराष्ट्रला अजून एकदाही रणजी ट्रॉफी जिंकता आली नाही.


पुजारामुळे ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये पुजारानं ३ शतकं आणि एक अर्धशतक करत ५२१ धावा केल्या होत्या. या कामगिरीमुळे पुजाराला मालिकाविराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं. पुजाराच्या या कामगिरीमुळे भारतानं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका २-१नं जिंकली होती. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच कसोटी मालिका विजय होता.