Cheteshwar Pujara : इंग्लंड टेस्टपूर्वी पुजाराचा धुमधडाका! विक्रमांची मोडतोड करत ठोकली `डबल सेंच्युरी`
Cheteshwar Pujara News : द्विशतक ठोकताच पुजारा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत.
Cheteshwar Pujara Double Century in Ranji Trophy : टीम इंडियाचा स्टार टेस्ट प्लेयर चेतेश्वर पुजारा गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय कसोटी संघातून लांब आहे. अशातच आता चेतेश्वर पुजाराने धमाकेदार द्विशतक (Cheteshwar Pujara Double Century) ठोकत सिलेक्टर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुजाराला साऊथ अफ्रिकेविरुद्ध संधी न दिल्याने अनेकांनी बीसीसीआयवर (BCCI) टीका केली होती. अशातच आता रणजी ट्रॉफी स्पर्धेत चेतेश्वर पुजारने डबल सेंच्युरी ठोकत इंग्लंड टेस्टपूर्वी (IND vs ENg Test) टीम इंडियाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यामुळे आता आगामी मालिकेत पुजाराला संधी मिळेल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy 2024) सौराष्ट्रच्या झारखंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या पुजाराने आपल्या फलंदाजीने द्विशतक झळकावलं. पुजाराने 236 धावांची धुंवाधार खेळी केली. त्यात 29 फोर लगावले. पुजारा 67.04 च्या स्ट्राइक रेटने 352 चेंडूत 236 धावा केल्याने सौराष्ट्रला मजबूत आघाडी मिळवून दिलीये. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पुजाराचं हे 17 वं द्विशतक आहे.
सौराष्ट्रने पहिल्या डावात (Jharkhand vs Saurashtra) लंचपर्यंत 4 गडी गमावून 566 धावा केल्या. पुजाराच्या या शानदार खेळीच्या जोरावर सौराष्ट्राने पहिला डाव 578/4 धावांवर घोषित केला. झारखंडने पहिल्या डावात 142 धावा केल्या होत्या, म्हणजेच सौराष्ट्रला 436 धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. पुजाराने आतापर्यंत 258 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 19812 धावा केल्या आहेत. पुजाराने या कालावधीत 61 शतके आणि 77 अर्धशतके केली आहेत.
पुजाराने मोडला लक्ष्मणचा रेकॉर्ड
दरम्यान, द्विशतक ठोकताच पुजारा भारतीय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. सुनील गावसकर हे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू आहेत. सुनील गावस्कर यांनी 348 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.46 च्या सरासरीने 25834 धावा केल्या. तर सचिनच्या नावावर 57.84 च्या सरासरीने 25396 धावा आहेत. तर क्रमांक तीनवर राहुल द्रविडचा नंबर लागतो. राहुल द्रविड 23794 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.