मुंबई : आयपीएल ही जागातील सर्वात मोठी लीग मानली जाते. या लीगमध्ये खेळाडू जीवतोडून मेहनत करतात. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशासाठी खेळण्याची संधीही पुढे मिळते. अशा या मोठ्या लीगमधून यंदा मात्र काही खेळाडूंनी माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या लीग संदर्भात स्फोटक फलंदाजाने मोठा खुलासा केला. या विस्फोटक बॅट्समनला सन्मानानं वागवलं नाही असा त्याने दावा केला. त्याच्यासोबत चांगलं वर्तन न केल्याचा त्याने आरोप केला. 


युनिव्हर्सल बॉस म्हणून प्रसिद्ध असलेला ख्रिस गेल हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये गेल कोणत्याही टीमचा भाग नाही. 


गेल्या काही वर्षांपासून ज्या प्रकारे आयपीएल होत आहे, त्यावरून मला वाटत होतं की मला योग्य वागणूक दिली जात नाही. मला वाटलं की मला योग्य सन्मान मिळत नाही म्हणून मी सोडण्याचा निर्णय घेतला. मी पुन्हा नॉर्मल वातावरणात येण्याचा प्रयत्न करत असल्याचंही ख्रिस गेलनं म्हटलं आहे. 


ख्रिस गेल कोलकाता, बंगळुरू आणि पंजाब टीमकडून खेळला आहे. मी पुन्हा आयपीएलमध्ये खेळण्यावर विचार करीन. आयपीएलला माझी गरज आहे असंही गेल बोलताना म्हणाला. बंगळुरू किंवा पंजाब दोन्ही पैकी एका टीमचा भाग असू शकतो. या दोन्ही टीमपैकी एका टीमला ट्रॉफीपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न असल्याचंही तो म्हणाला. 


 गेलने 142 आयपीएल सामन्यांमध्ये एकूण 4965 धावा केल्या आहेत. यपीएलच्या इतिहासात गेलच्या नावावर सर्वाधिक शतके आहेत. गेलने आयपीएलमध्ये 6 शतके झळकावली. त्याने आयपीएलच्या इतिहासात 357 षटकार ठोकले आहेत.


आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रमही ख्रिस गेलच्या नावावर आहे. आरसीबीकडून खेळताना ख्रिस गेलने 2013 मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध हा पराक्रम केला होता. या सामन्यात गेलने 30 चेंडूत आपले शतक पूर्ण केलं होतं.