मुंबई : क्रिकेट मधून वर्ल्ड कपनंतर रिटायरमेंट घेणारा वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलने एक रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सध्या इंग्लडंची टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. पाच वनडे मॅचच्या सीरिजमधल्या काल झालेल्या (२० फेब्रुवारी) पहिल्या वनडे मॅचमध्ये क्रिस गेलने १३५ रन केले. या खेळीत त्याने १२ सिक्स लगावले. यासोबतच वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड गेलने आपल्या नावे केला आहे. 


गेल आणि आफ्रिदी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिस गेलच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४८८ सिक्स आहेत. याआधी ४७६ सिक्ससोबत हा विक्रम आफ्रिदीच्या नावे होता. क्रिकेटच्या वनडे, टेस्ट आणि टी-२० या तिन्ही प्रकारानुसार विभागणी केली असता गेलने वनडे मध्ये २८७ सिक्स लगावले आहेत. तर टी-२० मध्ये गेलने १०३ सिक्स आणि टेस्टमध्ये गेलने ९८ सिक्स मारले आहेत.  गेलनं ४८८ सिक्स पैकी ४८७ सिक्स वेस्ट इंडिजकडून खेळताना लगावल्या. तर एक सिक्स वर्ल्ड xi या टीमसाठी होती. 


शतकी कामगिरी करणारा वयस्कर खेळाडू


सर्वात जास्त सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावे करणाऱ्या गेलने, सर्वाधिक वय असताना शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. शतकी खेळी करणारा गेल हा तिसरा वयस्कर बॅट्समॅन ठरला आहे. गेलने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात १२९ बॉलमध्ये १३५ रन केल्या. यावेळी गेलचे वय ३९ वर्ष १५२ दिवस इतके होते. श्रीलंकेचा माजी सलामीवीर सनथ जयसूर्या आणि युएईचा खुर्रम खान यांनी सर्वाधिक वय असताना शतक केलं आहे. खुर्रम खान याने त्याचे वय ४३ वर्ष १६२ दिवस इतके असताना शतक ठोकले होते. तसेच सनथ जयसूर्याने ३९ वर्ष २१२ दिवस इतके वय असताना शतकी खेळी करण्याची कामगिरी केली होती.