दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत (Nagarjuna) फोटो काढण्यासाठी आलेल्या दिव्यांग चाहत्याला त्याच्या सुरक्षारक्षकांनी धक्का देऊन बाजूला केल्याने वाद पेटला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकरी त्याच्यावर जोरदार टीका करत आहे. यानंतर नागार्जुनने माफी मागितली आहे. पण यामुळे चाहत्यांना सेलिब्रिटींकडून दिली जाणारी वागूणक हा चर्चेचा विषय ठरला आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनीही यावर भाष्य केलं आहे. दरम्यान या पोस्टवर कोलंबिया युनिव्हर्सिटीमधील भारतीय वंशाच्या प्राध्यापकाने भारताचा दिग्गज खेळाडू राहुल द्रविडसह (Rahul Dravid) झालेल्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा ऐकल्यानंतर तुमच्या मनात राहुल द्रविडबद्दल असलेलं प्रेम आणि आदर यामध्ये नक्की वाढ होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आमच्यात झालेल्या संवादाचा खुलासा केल्यामुळे राहुल द्रविडला वाईट वाटेल असं वाटत नाही. मी त्याच्यासोबत न्यूयॉर्कमध्ये फिरत असताना जवळपास 50 वेळा त्याला सेल्फीसाठी चाहत्यांनी थाबंवलं. प्रत्येकवेळी तो आदराने, हसत सेल्फीसाठी पोझ देत होता," असं द फू फाउंडेशन स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सचे व्हाईस डीन विशाल मिश्रा यांनी सांगितलं आहे. 


पुढे त्यांनी सांगितलं आहे की, "तुला हे कसं काय जमतं? फलंदाजी करताना तू संयम राखतोस, पण हे काहीतरी वेगळंच आहे. त्यावर तो म्हणाला की, ग्रेग चॅपेल यांनी मला यासंबंधी एक चांगला दृष्टीकोन दिला आहे. आम्हाला चाहत्यांकडून नेहमीच गराडा घातला जायचा. एकदा त्यांनी मला धडपडणाऱ्या चाहत्यांकडे हात दाखवत सांगितलं होतं की, राहुल तुझ्या आयुष्यात जे काही आहे ते सर्व यांच्यामुळे आहे".



"ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये तर हा प्रसिद्ध खेळांपैकीही नाही. तरी तुला इतकं प्रेम मिळत असेल तर तू फार भाग्यवान आहे. ग्रेग चॅपेल यांचे ते शब्द माझ्यासह कायमचे राहिले. जर मी एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो तर का नाही? एकाप्रकारे मी त्यांचा ऋणी आहे," अशी माहितीही त्यांनी दिली. तसंच राहुलसारखे व्हा असा सल्ला दिला. 



व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?


व्हायरल झालेल्या व्हिडीओत कॅफेमधील दिव्यांग कर्मचारी नागार्जुनला भेटण्यासाठी पुढे गेला असता त्याचा अंगरक्षक त्याला धक्का देऊन बाजूला करतो. विशेष म्हणजे यावेळी नागार्जुनचं लक्षही नसतं. तो काहीच न झाल्याप्रमाणे पुढे चालत राहतो. दुसरीकडे त्याच्या मागे असणारा धनुष हे सगळं पाहून व्यक्त होताना दिसतो. 


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 7.5 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी यावर कमेंट्स केल्या असून आपला संताप व्यक्त केला आहे.