मुंबई : बीसीसीआयचा अध्यक्ष होताच सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटपटूंना दिवाळी बोनस दिला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंना आर्थिक सुरक्षितता मिळावी म्हणून राष्ट्रीय खेळाडूंप्रमाणेच करार पद्धत सुरु करण्यात येणार आहे, असं गांगुलीने सांगितलं. करार पद्धत सुरु केल्यामुळे हजारो होतकरु क्रिकेटपटूंना याचा फायदा होईल, असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक क्रिकेटची आर्थिक स्थिती चांगली असून क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये वाढ केली जाणार असल्याचंही गांगुलीने सांगितलं आहे. स्थानिक क्रिकेटपटूंसाठी करार पद्धत तयार करण्याची जबाबदारी नवनियुक्त आर्थिक समितीकडे सोपवण्यात आल्याचं गांगुली म्हणाला आहे.


दुसरीकडे गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर भारतीय क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बांगलादेशविरुद्ध कोलकात्यामध्ये होणारी टेस्ट मॅच डे-नाईट असावी, असा प्रस्ताव बीसीसीआयने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला पाठवला आहे. या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने परवानगी दिली तर ही भारताची पहिलीच डे-नाईट टेस्ट असेल. डे-नाईट टेस्ट या गुलाबी बॉलने खेळवण्यात येतात.


अध्यक्ष झाल्यानंतर गांगुलीने मुंबईत कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माची भेट घेतली. या भेटीमध्ये डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल चर्चा झाली होती. 'आम्ही सगळे डे-नाईट टेस्ट मॅचबद्दल विचार करत आहोत. माझा डे-नाईट टेस्ट मॅचवर विश्वास आहे. कोहलीनेही यासाठी समर्थन केलं आहे. विराट डे-नाईट टेस्टच्या विरोधात आहे, अशा काही बातम्या येत होत्या, पण या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. खेळाला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे आणि हाच पुढचा मार्ग आहे. लोकांनी काम संपवून चॅम्पियन खेळाडूंना पाहायला आलं पाहिजे. हे कधी होईल, मला माहिती नाही, पण हे नक्की होईल,' असं गांगुली म्हणाला होता.