मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. जगभरामध्येही अशाच पद्धतीने कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी बंद पाळण्यात येत आहे. संपूर्ण जगच लॉकडाऊन झाल्याचा फटका क्रीडा स्पर्धांनाही बसला आहे. टोकयोमध्ये यंदाच्या वर्षी होणारं ऑलिम्पिक पुढच्या वर्षी होणार आहे. तर आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे क्रीडा स्पर्धांप्रमाणेच खेळाडूंचंही नुकसान व्हायची शक्यता आहे. आगामी काळात भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनात कपात होऊ शकते, असं वक्तव्य भारतीय क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक मल्होत्रा यांनी केलं आहे. कोरोना व्हायरसमुळे भविष्यातल्या सगळ्याच सीरिजवर संकट ओढावलं आहे.


भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज रद्द करण्यात आली, तर आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली. यामुळे बीसीसीआयचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. भारतातली सध्याची परिस्थिती बघता यंदाच्या वर्षी आयपीएल होण्याची शक्यता कमी आहे.


'बीसीसीआयची कमाई नेहमीप्रमाणे होणार नाही, त्यामुळे क्रिकेटपटूंनी मानधनात कपात होईल, याची तयारी ठेवावी. बीसीसीआय ही कंपनी आहे. जर कंपनीचं नुकसान होत असेल, तर त्याचा कर्मचाऱ्यांनाही फटका बसतो. युरोपात जवळपास सगळ्याच फूटबॉलपटूंच्या मानधनात कपात झाली आहे. फूटबॉलपटूंच्या असोसिएशननेच मानधन कपातीची घोषणा केली आहे. जगात सर्वाधिक मानधन या फूटबॉलपटूंना मिळतं,' असं मल्होत्रा म्हणाले.


'हे संकट अनपेक्षितरित्या आलं आहे. तसंच हा कालावधीही कठीण आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वत:च्या खिशातून द्यावं लागणार आहे. खेळाडूंचा पगार कमी करणं योग्य नाही, पण जर कंपनीच आधीसारखी कमाई करत नसेल, तर खेळाडूंनी मानधन कमी होईल, याची तयारी ठेवावी,' असं मल्होत्रा यांनी सांगितलं. 


कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने पीएम केयर्स फंडाला ५१ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख रुपये, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये, फीडिंग इंडियासाठी ५ लाख रुपये, स्ट्रे डॉग्ससाठी ५ लाख रुपये दिले आहेत.


याआधी सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपये, सुरेश रैनाने ५२ लाख रुपये, सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ, अजिंक्य रहाणेने १० लाख रुपयांची मदत केली होती.