मुंबई: देशात पुन्हा एकदा कोरोना आणि ओमायक्रॉनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.सर्वसामन्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सगळीकडे सध्या कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. याच कोरोनाचं सावट आता IPL वर देखील आहे. आयपीएल 2022 साठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यासाठी तारखाही जवळपास निश्चित होत होत्या. मात्र कोरोनाने पुन्हा खो घातला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाढत्या कोरोनामुळे आता आयपीएलच्या तारखा देखील पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 फेब्रुवारीला बंगळुरू इथे आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी मेगा ऑक्शन होणार होतं. मात्र वाढत्या कोरोनामुळे या तारखा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. 


सध्या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेवून आहोत. त्यामुळे येत्या काळात काय परिस्थिती असेल त्यावर आम्ही पुढचे निर्णय घेऊ. . सध्या तरी आयपीएलची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे, जे अद्याप बदललेले नाही. पण त्या वेळी जी परिस्थिती असेल त्यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळाली आहे. 


कोरोनाचं सावट असलं तरी देखील BCCI कडून ऑक्शन आणि IPL 2022 सरकारचे नियम पाळून कसं सुरक्षितपणे पार पाडता येईल याबाबत नियोजन सुरू आहे.  यावेळी बीसीसीआयला स्पर्धेत कोणताही व्यत्यय नको आहे आणि म्हणूनच सर्व फ्रँचायझींना त्यासाठी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.


गेल्या वर्षी IPL 2021 चौदाव्या हंगामात 4 मेपर्यंत सामने झाले होते. त्यानंतर आयपीएलमध्ये कोरोना घुसल्यामुळे स्पर्धा थांबवण्यात आली होती. उर्वरित सामने दुबईमध्ये सप्टेंबर महिन्यात खेळवण्यात आले होते. यंदाही आयपीएलवर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे यावेळी काय नियोजन असणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.